कोल्हापूर : जिल्ह्यतील करोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी जिल्ह्यत १५ दिवस र्निबधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून जिल्ह्यच्या सीमेवरील नाक्यांवर तपासणी आणखी कडक करण्यात येणार आहे, असा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात करोना साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रभावी उपाययोजना राबवण्याबाबत बैठक घेण्यात आली.

या वेळी देसाई म्हणाले, महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत रस्त्यांवर अनावश्यक कारणाने फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन तपासणी करून घ्या. रुग्णसंख्या अधिक प्रमाणात असणाऱ्या शिरोळ, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यांतील प्रतिबंधित क्षेत्रांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. गावनिहाय व प्रभागनिहाय सूक्ष्म नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करावी.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, करोनाची जिल्ह्यतील रुग्णसंख्या लवकर कमी होण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोविड केंद्रातील रुग्णांच्या तब्बेतीच्या चढउतारावर लक्ष देऊन रुग्णांना आवश्यक त्या सर्व सेवासुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी करोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली.