23 January 2018

News Flash

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरुच; पंचगंगा नदीचा प्रवाह पात्राबाहेर

तीन मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

कोल्हापूर | Updated: July 19, 2017 1:13 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. बुधवारी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. यंदाच्या हंगामात पाणी पात्राबाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. धरण व नद्यांतील वाढणारी पाणी पातळी पाहून प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यावर्षी जुनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावली. जुनमध्ये १५ दिवस पावसाचा मुक्काम होता. त्यानंतर पावसाने दडी मारली. जूलैचा पहिला आठवडा उलटला तरी पावसाचा पता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. पेरणी केलेल्या पिकांची उगवण चांगली झाली असताना पाऊस नसल्याने पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट डोके वर काढत होते.

जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती असताना पावसाचे पुनरागमन झाले. गेल्या आठवडाभर जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये पाऊस पडत आहे. पश्चिमेकडील गगन बावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, बुदरगड, आजरा व चंदगड येथे मुसळधार पाऊस पडत आहे. कोदे व घटप्रभा ही धरणे पूर्णता भऱली असून त्यातून विसर्ग सुरु आहे. तर पंचगंगा व अन्य नद्यावरील दहा बंदारे भरुन वाहू लागले आहेत. राधानगरी धरणामध्ये निम्म्याहून अधिक पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काळमवाडी धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय प्रमाणात पाणी वाढ होत चालली आहे. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे येथील पंचगंगा दुथडी भऱून वाहू लागली आहे. बुधवारी सकाळी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. पावसाला सुरुवात होऊन सुमारे दिडमहिनाझाल्यानंतर यावर्षी प्रथमच नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. अद्यापही पावसाचा मुक्काम जिल्ह्याच्या सर्व भागात कायम आहे. जिल्ह्यातील तीन मार्गावरील वाहतूक बंद असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

 

First Published on July 19, 2017 1:09 pm

Web Title: kolhapur district continues to rain panchganga river out of flow
  1. No Comments.