हंबीरे येथील एका व्यक्तीच्या जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याच्या तक्रारीमुळे गडहिंग्लज उपविभागीय पोलीस उप अधीक्षक अंगध जाधवर यांच्यासह अन्य चौघांवर बुधवारी चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

चंदगड तालुक्यातील हंबीरे येथील लक्ष्मण भोजू तांबाळकर (वय ५५) यांची जमीन खोटी कागदपत्रे तयार करून हडप करण्यासाठी प्रयत्न झाला आहे. या कटात गडहिंग्लज उपविभागीय पोलीस उप अधिक्षक अंगध जाधवर तसेच गणेश मारूती फाटक, श्रीशैल तमाचा नागराळ, मारुती धोंडिबा गुरव, मारूती तातोबा कांबळे पाच जणांनी बेकायदेशीर, खोटी खरेदी करून फसवणूक केली. ही जमीन लक्ष्मण तांबाळकर यांच्यासह सहहिस्सेदार धोंडिबा गोविंद गावडे, संतोष गोविंद गावडे, दत्तात्रय नारायण गावडे, शंकर बाळू गावडे, शिवाजी अर्जुन गावडे, तानाजी अर्जुन गावडे, तुळसा अर्जुन गावडे, सुभद्रा अर्जुन गावडे, कृष्णा राघु झेंडे, रुक्मिणी विठोबा गावडे, कृष्णा विठोबा गावडे, नामदेव विठोबा गावडे, भिमा विठोबा गावडे (सर्व रा. सडे गुडवळे ता.चंदगड) यांच्या मालकीची आहे.

गोळी मारण्याची धमकी

जमीन मालकांनी आपल्यावरील अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. त्याला प्रतिसाद देण्याऐवजी पोलीस उप अधिक्षक अंगध जाधवर यांनी गोळी घालण्याची धमकी दिल्याची तक्रार लक्ष्मण तांबाळकर यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंद केला आहे.