कोल्हापूर : मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन सुरू केले असताना मंगळवारी कोल्हापुरातच सकल मराठा समाजाच्यावतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. यापुढे  ठोक मोर्चे काढून राज्य सरकारला ताळ्यावर आणले जाईल, असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला. राज्य शासन संभाजीराजांना फसवत आहेत असाही आरोप यावेळी करण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात संभाजी राजे छत्रपती यांनी गेल्या आठवडय़ामध्ये मूक आंदोलन केले होते. करोना संसर्ग असल्याने रस्त्यावरील आंदोलने नसावीत अशी त्यांची भूमिका होती. तथापि आज कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

येथील रणरागिनी ताराबाई छत्रपती चौकात समाजाचे लोक जमले. शहरात प्रवेश करणाऱ्या या मुख्य चौकात समाजाची मोठी गर्दी झाली. हातात भगवे झेंडे घेतलेल्या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, जय शिवाजी जय भवानी, आरक्षण आमच्या हक्काचं,  अशा घोषणा दिल्या.

सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. समरजितसिंह घाटगे यांनी राज्य शासनाने कोल्हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी संभाजीराजे यांनी केलेल्या प्रयत्नाचे स्वागत केले. राज्य शासन मराठा आरक्षणप्रश्नी वेळकाढू धोरण घेत आहे. समाजाने ठोक आंदोलन करायचे ठरवले तर मी पुढे असेन, असे सांगितले. अन्य आंदोलकांनीही राज्य शासन संभाजीराजांना फसवत आहे असा आरोप केला. ठोक मोर्चा काढल्याशिवाय राज्य सरकारला जाग येणार नाही, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. बाबा इंदुलकर, निवास साळुंखे, महेश जाधव, दिलीप देसाई, जयेश कदम यांच्यासह महिलाही लक्षणीय संख्येने सहभागी झाल्या होत्या.