सहृदयी, अनुभवी आणि अल्पसंख्याक असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी भाजपात यावे, अशी खुली ऑफर भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुश्रीफ यांचे विधानसभेचे भाजपचे स्पर्धक म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासमोर दिली.

महावितरण आणि ईईएसएलच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा गडहिंग्लज येथे आज करण्यात आला. हा कार्यक्रम सौर ऊर्जेपेक्षा पाटील-मुश्रीफ यांच्यातील राजकीय टिपणीमुळे अधिक लक्षवेधी बनला.

कार्यक्रमास आमदार संध्यादेवी कुपेकर, नगराध्यक्ष स्वाती कोरी, गोकुळचे संचालक बाबा देसाई,  विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अनिल भोसले, ईईएसएलचे अतिरिक्त महासंचालक अनिल दाभाडे आदी उपस्थित होते.

प्रवेशाच्या यादीत मुश्रीफ अकरावे

या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर स्तुतिसुमने उधळतानाच अलगदपणे मुश्रीफ यांना भाजपात येण्याचे निमंत्रण दिले. ‘यापुढे सत्ता आमचीच येणार आहे. तुमची पाच वर्षे वाया जातील. त्यापेक्षा मुश्रीफ यांनी भाजपात यावे, अशी खुली ऑफर देतानाच त्यांनी ‘दहा जणांची यादी तयार आहे, तुम्हीच अकरावे असाल’, अशी टिपणी केली.

राष्ट्रवादीतच बरा – मुश्रीफ

राजीनामा देणाऱ्या आमदारात मी नाही, असे स्पष्ट करतानाच मुश्रीफ हेही चंद्रकांतदादांचे कौतुक करण्यात मागे राहिले नाहीत. ते म्हणाले, एखाद्याचे नशीब पाच वर्षांत किती फळफळते हे दादांकडे पाहून कळते. आमदार, मंत्री याबरोबर त्यांना प्रदेशाध्यक्ष मिळाले आहे, पण मी आता या पदासाठी शुभेच्या देणार नाही , कारण ते विरोधी पक्षाचे प्रमुख आहेत, अशी टिपणी मुश्रीफ यांनी केल्यावर हंशा  पसरला.

सौरऊर्जाद्वारे २ वर्षांत शेतकऱ्यांना वीज

शेतकऱ्यांना स्वस्त वीज देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उपयुक्त आहे. राज्यातील शेतकऱ्यंना २२ हजार मेगावॅट वीज लागणार असून सौरऊर्जाद्वारे येत्या दोन-तीन वर्षांत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. डिसेंबर अखेर २०० मेगावॅट वीज सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे उपलब्ध होईल. सौर ऊर्जेमुळे शेती-उद्योगाचे अर्थकारण बदलणार आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.