सत्तेचा मार्ग ‘देवाचिये द्वारा’तून जातो याचा अंदाज आल्याने आता पुरोगामी चेहऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही रथयात्रा, साकडे, देवदर्शन अशा धार्मिक अंगाने जाणाऱ्या विधींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे. आजवर कटाक्षाने धार्मिक बाबींपासून दूर राहणाऱ्या या पक्षाने यंदाच्या या आंदोलनाला प्रारंभ करण्यापूर्वी ‘महालक्ष्मी’ला साकडे घातले. तसेच पूर्वसंध्येस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी देवीचा रथ देखील ओढून नेला. आजवर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग दिसणाऱ्या या अशा धार्मिक कार्यात आता  राष्ट्रवादीही  सहभाग घेऊ लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रथयात्रा, देवदर्शन, होम-हवन, नदी पूजन, साधू-संतांना नमन हे सारे मार्ग आजवर भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्या नावावर दिसायचे. कुठलेही कार्य, आंदोलन, योजना, प्रचाराचा प्रारंभ करताना या दोन्ही पक्षांकडून हमखास ही वाटचाल दिसून यायची. पण यामुळे मतपेढीत झुकणारे समाजमन लक्षात घेऊन सुरुवातीला काँग्रेस आणि आता त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीने ही वाटचाल अवलंबली आहे.

याबाबतचा बारकाईने विचार करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत देव-देवता, मंदिरभेटीचा मार्ग स्वीकारला होता. भाजपच्या कडव्या िहदुत्वाच्या प्रचाराला गांधी यांचे हे समान वर्तनाचे उत्तर फायदेशीर ठरले, असे निरीक्षण अभ्यासकांनी व्यक्त केले होते. इतक्यावर न थांबता राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही हाच क्रम पुढे सुरू ठेवला आहे. आता काँग्रेसच्या पुरोगामी विचारांच्या मुशीतून बाहेर येऊन स्वतंत्रपणे वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादीनेही याचेच अनुकरण केल्याचे कोल्हापुरात दिसत आहे.

रथयात्रेतही सहभाग

‘हल्लाबोल आंदोलन’च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांचा कालपासूनच कोल्हापुरात मुक्काम आहे. या आंदोलनासाठी पूर्वसंध्येला शहरात दाखल झालेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार चित्रा वाघ यांनी पहिली धाव घेतली ती करवीर निवासिनी महालक्ष्मीकडे. रात्री देवीची रथयात्रा निघाली होती. त्यात सहभागी होत या नेत्यांनी रथ वाहून नेण्याला हातभार लावला. दिवस उगवताच ही मंडळी पुन्हा मंदिराकडे धावली. त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. याच वेळी अजित पवार यांनी ‘इडा पिडो टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हणत श्री अंबाबाईला साकडे  घातले. बळिराजाच्या दुखाला फुंकर घालत सत्ता मिळवण्याचा हा पक्षाचा प्रयत्न होता हे दिसून येत होते.