22 February 2020

News Flash

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर

राज्यातील सत्ता समीकरणाचा महापालिकेच्या राजकारणावर चांगलाच परिणाम झाला आहे

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड  झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना आनंदाने उचलून खांद्यावर घेतले. ( छाया - राज मकानदार)

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५० व्या महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची सोमवारी बहुमताने निवड झाली. भाजप – ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर यांना एकमेव मत मिळाले, तर आजरेकर या ४८ मते मिळवून विजयी झाल्या. विजयानंतर आजरेकर समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला.

महापौर निवडीसाठी आज महापालिकेत विशेष सभा झाली. काँग्रेसच्या आजरेकर विरुद्ध ताराराणी आघाडीच्या पागर यांच्यामध्ये लढत होती. काल रात्री उशिरा विरोधी गटनेते अजित ठाणेकर, सत्यजित कदम व विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांनी ‘महापौरपदाचे तुकडे होऊन पदाची प्रतिष्ठा लयाला जात असल्याच्या निषेधार्थ सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केल्याने विरोधी आघाडीचे कोणीही उपस्थित राहिले नाहीत. मात्र कमलाकर भोपळे हे एकटेच उपस्थित राहिले. त्यामुळे मतदान घेण्यात आले. त्यात निलोफर आजरेकर ४८ विरुद्ध १ मताने एकतर्फी विजयी झाल्या.

नूतन महापौरांचा कार्यालय प्रवेश

नूतन महापौर निलोफर अश्कीन आजरेकर यांनी निवड  होताच कामाला  हात घातला. आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात आमदार चंद्रकांत जाधव व नबीला अबीद मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.

नगरसेवकांसह त्यांचे सासरे, मुस्लिम बोर्डिगचे अध्यक्ष गणी आजरेकर, आश्पाक आजरेकर, कुटुंबीय उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ वाढले

राज्यातील सत्ता समीकरणाचा महापालिकेच्या राजकारणावर चांगलाच परिणाम झाला आहे. परिणामी सत्तारूढ आघाडीचे संख्याबळ ४४ पेक्षाही अधिक झाले आहे. विरोधी आघाडी ३३ वर आली आहे. यापूर्वीच्या महापौर निवडीदरम्यान नगरसेवक अपात्र प्रकरण आणि फुटीर नगरसेवकांची चांगलीच चर्चा होत होती. अनेकदा जात—वैधता प्रमाणपत्रावरून कोणत्याही क्षणी अपात्र नगरसेवकांचा आदेश येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे निवडीदरम्यान प्रचंड तणाव आणि संघर्ष शहराने अनुभवला आहे. मात्र, आज होणारी निवड  याला अपवाद ठरली.

‘मोका‘फेम शमा मुल्ला सभागृहात

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत सलीम मुल्ला त्यांची पत्नी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह ४१ संशयितांवर कारवाई झाली आहे. शमा मुल्ला या महानगरपालिकेच्या ६ सर्वसाधारण सभांना गैर हजर असल्याने त्यांचे नगरसेवक यापूर्वी रद्द करण्यात आले. या निर्णयाविरोधात त्यांची उच्च न्यायालयालयात धाव घेऊन स्थगित आणली. त्यांना न्यायालयाच्या परवानगीने पोलीस बंदोबस्तात आज महापौर निवडीसाठी सभागृहात आणण्यात आले होते. त्यांनी महापौर निवडीवेळी मतदानही केले.

 

 

First Published on February 11, 2020 12:51 am

Web Title: nilofer ajarekar of congress elected as mayor of kolhapur zws 70
Next Stories
1 ‘केंद्राच्या धरसोड धोरणांमुळे देशातील उद्योजकांचीही गुंतवणुकीबाबत अनास्था’
2 करोना विषाणूमुळे चीनमधील कापूस निर्यातीवर परिणाम
3 टेक्निकल टेक्स्टाईलसाठी केंद्र उत्सुक