कोल्हापूर : ओबीसी आरक्षणावरून अनेक जण आदळआपट करत आहेत. गर्दी करून ताकद दाखवता येऊ शकते. परंतु यातून करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सारथीच्या कोल्हापुरातील उपकेंद्राचे दूरभाष प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याच वेळी राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने केलेल्या आंदोलनावर अप्रत्यक्षपणे तोफ डागली.

ठाकरे म्हणाले, की न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणे हा भाग आहे. तथापि संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे नेमके कळते तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे, तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरू केला. मात्र अनेक जण आदळआपट करत असले तरी मी तूर्तास फार बोलणार नाही. ठाकरे यांनी, ‘नाती ओढूनताणून पुढे नेता येत नाहीत’, असे केलेले विधान कोणाच्या दिशेने होते याची मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. सरकार म्हणून शक्य ते सर्व करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले,की आरक्षणाच्या अनुषंगाने कायद्याची लढाई शासनाने सुरू ठेवली आहे.