News Flash

बेळगावात मराठी अस्मितेचे दर्शन

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला सव्वा लाख मते

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला सव्वा लाख मते

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर:  अलीकडच्या काळामध्ये भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या बेळगाव जिल्ह्य़ात लोकसभा पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कमळ फुलले. पतीच्या निधनानंतर मंगला अंगडी यांनी निसटता का असेना पण विजय मिळवला. भाजप-काँग्रेस या तुल्यबळ लढतीत लक्षवेधी ठरले ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके. सव्वा लाख मते घेतलेल्या शेळके यांच्यामुळे निवडणुकीचे समीकरण बदलून तर गेलेच, पण सीमाभागातील प्रतिसादामुळे मराठी भाषिकांच्या लढय़ाला बळही प्राप्त झाले आहे.

सीमा भागाच्या लढाईचे प्रमुख केंद्र म्हणून बेळगाव जिल्हाकडे पाहिले जाते. मराठी भाषकांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीला विधानसभा, बेळगाव महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळत आले. तथापि, लोकसभा निवडणुकीच्या यशाने नेहमीच हुलकावणी दिली आहे. यापूर्वी मराठी उमेदवारांनी निवडणूक लढवली पण यशाची माळ गळ्यात पडली नाही. या मतदारसंघातील निवडणुकीत सुरुवातीला कँाग्रेस आणि अलीकडे भाजपचा प्रभाव दिसून आला.

भाजपने गड राखला

बेळगाव लोकसभा काँग्रेसच्या प्रभुत्वाला १९९८ मध्ये भाजपने पहिल्यांदा शह दिला. त्यानंतर हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसने राखला होता. परंतु २००४ पासून कँाग्रेसच्या यशाला कायमचे ग्रहण लागले. बेळगाव जिल्ह्य़ात लिंगायत समाजाचे वर्चस्व असल्याने जातीय समीकरणाचा फायदा सुरेश अंगडी यांना झाला. त्यांनी सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये यशाची पताका फडकवत ठेवली. गेल्या निवडणुकीत तर पावणेतीन लाखाच्या मताधिक्क्याने विजय मिळवून त्यांनी विक्रम नोंदवला होता.

त्यांच्याकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पद सोपवले होते. त्या आधारे त्यांनी मतदारसंघात चांगली कामे केली होती. याचाच फायदा त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना झाल्याचे दिसते. त्यांचे व्याही, कर्नाटकचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी प्रचारासाठी मतदारसंघात ठाण मांडले होते. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक मंत्री प्रचारात उतरले होते. देवेंद्र फडणवीस यांनीही मतदारसंघात सभा घेतल्याने काही प्रमाणात मराठी मते भाजपकडे वाढण्यास मदत झाली. परिणामी अंगडी यांच्या घरात पाचव्यांदा खासदारकी आली.

मंगला अंगडी यांच्या रूपाने बेळगाव जिल्ह्य़ाला पहिल्या महिला खासदार मिळाल्या. या मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवण्यास अनेक जण इच्छुक होते. त्यांना नाकारले गेल्याने भाजपच्या मताधिक्यात मोठय़ा प्रमाणात घट झाली. इतकी की पराभव थोडक्यात टळला.

कँग्रेसचा निसटता पराभव

दुसरीकडे काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी दिलेली लढत उल्लेखनीय ठरली. कर्नाटकातील भाजप सरकारमधील त्यांचे बंधू रमेश जारकीहोळी मंत्री होते. संशयास्पद चित्रफीत प्रकरणी त्यांना मंत्रिपदावरून दूर केल्याने त्यांची ताकद बंधूच्या मागे लागल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून जाणवत आहे. जारकीहोळी यांनी मतमोजणीच्या उत्तरार्धात १२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने विजय दृष्टिपथात आला होता. अखेरच्या क्षणी अंगडी यांनी तो हिरावून घेतला. या मतदारसंघात २०१४ मध्ये काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी यांनी अवघ्या ३००३ मतांनी भाजपचे रमेश कत्ती यांचा पराभव केलेल्या संघर्षपूर्ण लढतीला यानिमित्ताने उजाळा मिळाला.

नवनिर्वाचित खासदार मंगला अंगडी यांना तीन वर्षांचा कालावधी मिळणार असून मतदारसंघात मोठी कामे करून दाखवावी लागणार आहेत.

दिवंगत खासदार केंद्रीय राज्यमंत्री अंगडी यांनी जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरू के ली होती. ती पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. नूतन खासदारांनी पती सुरेश अंगडी यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

एकीकरण समितीची लढत

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी निकाल फिरवतानाच विक्रमी कामगिरीची नोंद केली. १९८० साली समितीचे आनंद गुप्ते यांनी ७६ हजार ३३० तर १९८९ माजी उपमहापौर ए. पी. पाटील यांनी एक लाख आठ हजार मते मिळवली होती. २००४ मध्ये शिवसेनेने आखाडय़ात उडी घेतली तेव्हा बी. टी. पाटील यांना एक लाख पाच हजार मते मिळाली होती. यावेळी सिंह चिन्हावर लढलेले युवा आघाडीचे अध्यक्ष शेळके यांनी सव्वा लाख मते घेऊन मराठी भाषिक उमेदवारात सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम नोंदवला. त्यांना मिळालेल्या मतामुळे भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही तर काँग्रेसचा विजय हिरावला गेला.

शेळके यांना बेळगावच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसच्या बरोबरीने मते मिळाली. सौंदत्ती, रामदुर्ग येथेही चांगले मते मिळाल्याने मराठी भाषिकांचा लढय़ाला पाठिंबा असल्याचे दिसले. संजय राऊत व धैर्यशील माने हे शिवसेनेचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रचाराचा मराठी सिंहाला लाभ झाला. या निवडणुकीत एकीकरण समितीचे काही प्रमुख प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजप- काँग्रेसच्या प्रचारात असल्याने समाज माध्यमातून जोरदार टीकाही झाली होती.

तरीही शेळके यांनी मिळालेल्या मतामुळे मराठी भाषिकांचा लढा अधिक प्रखरपणे तर लढला जाईलच, पण तेथील विधानसभा, महापालिकेतील यशाची चुणूकही दिसून आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:21 am

Web Title: over 1 25 lakh vote to maharashtra ekikaran samiti candidate in belgaum zws 70
Next Stories
1 ‘गोकुळ’च्या मतदानावेळी करोना नियमांचा विसर
2 बेळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपने राखला
3  ‘गोकुळ’साठी चुरशीने मतदान;  दोन्ही गटांकडून विजयाचे दावे
Just Now!
X