ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित समीर गायकवाड याच्यावरील चार्जफ्रेम बाबतची सुनावणी पुन्हा पुढे गेली आहे. आता ती ३० ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडली आहे. चार्जफ्रेमबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी २४ ऑगस्ट रोजी असल्याने जिल्हा न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचे आज येथे दिसून आले.

ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी समीर विष्णू गायकवाड (सांगली) याला अटक केली होती. त्याच्यावर दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केले होते.

समीरचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर समीरच्या वकिलांनी समीरवर चार्जफ्रेम करण्याची मागणी केली होती. मात्र तपासाबाबत असमाधान व्यक्त करत समीर विरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगून समीरवर जार्चफ्रेम करू नये अशी मागणी पानसरे कुटुंबीयांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. याबाबत उच्च न्यायालयात पुढील  सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे.

सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी न्यायालयात समीरवर चार्जफ्रेमबाबत सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी ही मागणी मान्य करत चार्जफ्रेम बाबतची पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी असल्याचे सांगितले. समीर गायकवाडचे वकील समीर पटवर्धन यांनी या प्रकरणातील शैलेंद्र शिंदे व साडविलकर यांच्या जबाबाच्या प्रति मिळण्याची मागणी केली असता ती देण्यास न्यायालयाने सांगितले.