नृसिंहवाडीत चौथ्यांदा दक्षिणद्वार सोहळा

कोल्हापूर : सलग तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यत पावसाने कोल्हापूर जिल्ह्यत धुमाकूळ घातला आहे. जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत बनले. आधीच खड्डय़ांनी हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना भर पावसात काढताना चांगलीच कसरत करावी लागत होती. गेले दोन दिवस वाढलेली पंचगंगा नदीची पाणीपातळी गुरुवारी दोन फुटांनी कमी झाली आहे. तर कृष्णा नदीच्या पाणीपातळीत रातोरात ८ फुटांनी वाढ झाली आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात महापुराने बुधवारी रात्री मंदिरात पाणी शिरले. यंदा चौथ्यांदा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.

कोल्हापूर जिल्ह्यत गेले तीन दिवस पावसाचा कहर सुरू आहे. पावसाची गती पाहता महापुराची आठवण येत आहे. जिल्ह्यच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊ स पडत आहे. शहरालाही पावसाने आज पुन्हा झोडपून काढले. रेनकोट, छत्री याचा वापर करून पावसापासून संरक्षण करावे लागले. पादचारी, व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. सखल भागात पाणी जास्त प्रमाणात साचल्याने दुचाकी पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. राजाराम बंधारा येथे आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पंचगंगा नदीची पाणीपातळी १८.१० फूट होती. काल ही पातळी २०.७ फूट होती, तर परवा दिवशी १४ फूट होती. काल बरेचसे वाढलेले पाणी आज दोन फुटांनी कमी झाले.

शिरोळ तालुक्यात नद्यांना आलेल्या पुरामुळे नागरिकांत पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी महापुराचा फटका मोठय़ा प्रमाणात बसतो. गेल्या दोनतीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने पात्रात गेलेले पाणी पुन्हा वाढले आहे. बुधवारी सकाळपासून पाणीपातळी वेगाने वाढून रात्रीपर्यंत जवळपास ८ फूट वाढले. कृष्णेला पूर येऊ न पाणी रात्रीच्या सुमारास मंदिरात शिरले, तद्नंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास चौथ्यांदा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दरम्यान मंदिर प्रशासन कर्मचारी यांनी श्रीं ची मूर्ती नारायण स्वामी मठात दर्शनासाठी ठेवली आहे. येथे भाविक मोठय़ा प्रमाणात दर्शन घेत आहेत. पाण्याची पातळी वाढत आहे.