खाऊचे आमिष दाखवत चार वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिला विहिरीत ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील चंदूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी संशयित दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत चिमुकली आणि अल्पवयीन संशयित हे हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे एकाच भागात राहण्यास आहेत. रविवारी दुपारी मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दोन्ही संशयित मुलांनी नजिकच्याच शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला पडक्या विहिरीत ढकलून देऊन तिचा खून केला. मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरु केला. परंतु पडक्या विहिरीत मुलीचा मृतदेह आढळल्याने नातेवाईकांना धक्का बसला. खेळताना अथवा अनावधानाने ती विहिरीत पडली असावी या समजुतीतून विहिरीतून मुलीचा मृतदेह काढून नातेवाईकांनी विधीवत दफन केला.
मात्र, सोमवारी या घटनेबाबत नातेवाईकांनाही संशय आल्याने परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यातील सीसीटिव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलीस चौकशीत दोघाही अल्पवयीन मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 7:29 pm