खबरदारीसाठी नागरिकांचे स्थलांतर; मदतीसाठी ‘एनडीआरएफ’ची दोन पथके दाखल

कोल्हापुरातील पंचगंगा नदीने रविवारी इशारा पातळी गाठली. यामुळे प्रशासन सतर्क झाले असून धोका भागातील लोकांचे खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतर सुरू केले आहे. शिरोळमधील ४ गावांतून ९७ तर करवीर मधील एका गावातून २५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्य़ात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची दोन पथके दाखल झाली आहेत.

गेला आठवडाभर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. राधानगरी, कोयना, चांदोली धरणातील विसर्ग वाढला आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत गेल्या २४ तासांत २ फुटांनी वाढ झाली. सायंकाळी पंचगंगा ३९ फूट इशारा पातळीवरून वाहत होती.

राधानगरी धरणाचे ५ स्वयंचलित दरवाजामधून ८५४० तर अलमट्टीमधून १ लाख ८२ हजार पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यतील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

चिखली, आंबेवाडीकर चिंतेत

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचागंगा नदीची पातळी इशारा पातळीवरून वाहू लागल्याने कोल्हापूर जवळील चिखली गावातील ग्रामस्थ पुन्हा भयभीत झाले आहेत. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून चिखली, आंबेवाडी ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या महिन्यात महाप्रलयावेळी चिखली आणि आंबेवाडी गावाला गावांना  फटका बसला होता. नागरिक आता पुन्हा एकदा स्थलांतर करत आहेत.

३५० कुटुंबांचे स्थलांतर

पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिरोळमधील चार गावांतील ९७ कुटुंबातील ३७५ व्यक्तींचे तर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीमधील २५० कुटुंबातील ३९० जणांचे  स्थलांतर करण्यात आले आहे.