दयानंद लिपारे

सतेज पाटील, मुश्रीफ गटाचे वर्चस्व

कोल्हापूर : ‘गोकुळ चांगलं चाललंय’ या सत्ताधाऱ्यांच्या प्रचारातील घोषवाक्याला ‘आता गोकुळ उरलंय’ हे विरोधकांचे घोषवाक्य सरस ठरले. लोकसभा, विधानसभेपाठी महाडिक यांना धक्का देत पालकमंत्री सतेज पाटील यांची गोकुळची रणनीती यशस्वी ठरली. ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार विरोधी गटाकडे येण्याचा निर्णय विरोधकांना लाभदायक ठरला. महाडिक यांचा गोकुळ दूध संघातील ३० वर्षांच्या सत्तेचा सूर्य आज मावळला.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले होते. आनंदराव पाटील चुयेकर यांनी स्थापन केलेल्या दूध संघावर गेली तीन दशके महादेवराव महाडिक यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले. त्यांना पी. एन. पाटील, अरुण नरके यांची साथ लाभली. त्यांच्या काळात गोकुळचा उत्कर्षही झाला. दूध संकलन १४ लाख लिटपर्यंत पोहोचले. उलाढाल अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचली. याच वेळी गोकुळमधील गैरव्यवहाराच्या चर्चेला तोंड फुटले. त्यातून गोकुळच्या प्रतिमेला धक्का बसला.

त्याचा फायदा सतेज पाटील यांनी उचलला. गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून सतेज पाटील, संजय मंडलिक यांनी लढा दिला. मागील निवडणुकीत त्यांच्या आघाडीला थोडक्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. या वेळी त्यांना ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे पाठबळ मिळाले. शिवाय त्यांनी आघाडीला महाविकास आघाडीचा चेहरा दिल्याने राजकीय बळ हे वाढले. तुलनेने सत्तारूढ गट किल्ला लढवण्यात कमी पडला. महाडिक कुटुंबीय, आमदार पी. एन. पाटील यांनी प्रयत्नाची शर्थ करूनही त्यांना अपयश आले.

सत्तारूढ गटाने गोकुळच्या यशकीर्तीचा उल्लेख करीत ‘गोकुळ चांगलं चाललंय’ अशी प्रचाराचे घोषवाक्य बनवले होते. त्यासाठी संबंधित ठरावधारकांना नव्हे तर गोकुळ मधील कर्मचाऱ्यांनाही प्रचाराला जुंपले होते. त्या विरोधात ‘आता गोकुळ उरलंय’ हे घोषवाक्य घेऊन सतेज पाटील आखाडय़ात उतरले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी धनंजय महाडिक यांच्या विरोधात ‘आमचं ठरलंय’ हे घोषवाक्य वापरले होते. त्यामुळे काँग्रेसचा मतदार शिवसेनेकडे वळला आणि संजय मंडलिक यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत ‘आता गोकुळ उरलंय’ या घोषवाक्याने वातावरण बदलले. दहा वर्षे संघर्ष करणाऱ्या विरोधकांच्या हाती गोकुळची सत्ता आली आहे. या निकालामुळे सतेज पाटील यांचे मनोधैर्य उंचावले असून आता ते महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात असलेल्या एकमेव छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आव्हान देण्यास सज्ज झाले असून पाटील विरुद्ध महाडिक यांचा हा मुकाबला कसा रंगतो राहतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

आरक्षित जागांचे निकाल

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील पाच आरक्षित जागांचे निकाल विलक्षण तितकेच लक्षवेधी ठरले आहेत. या ५ आरक्षित मतदार संघाची मोजणी सर्वप्रथम झाली. यामध्ये महिला गटात शिवसेनेच्या अंजना रेडेकर यांनी विजय मिळवला. शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडी घेत शौमिका महाडिक या विजयी झाल्या. याशिवाय, विरोधी गटातून अमर यशवंत पाटील (इतर मागास वर्गीय) डॉ. सुजित मिणचेकर (मागासवर्गीय) व बयाजी शेळके (भटक्या—विमुक्त) हे तिघे जण विजयी झाले.