हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील महावितरणच्या तिळवणी लघु ३३ के.व्ही. वीज उपकेंद्रात शनिवारी पहाटेच्या सुमारास ३.१५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर चोरीला जाण्याची घटना वीज कर्मचारी व पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली. यात एका चोरट्याला पकडण्यात यश आले असून, दोन चोरटे फरार झाले आहेत मात्र जेरबंद चोरट्यामुळे फरार आरोपींची नावे पोलिसांना समजली आहेत. मागील सहा महिन्यांत या भागातील चंदूर, साजणी, रुई, माणगाव व यड्राव येथे रोहित्रातील तांब्याची कॉइल चोरीला गेलेल्या घटनांचाही छडा लागणार आहे.

तिळवणी लघु उपकेंद्रात उपकेंद्रात मागील काही महिन्यांपासून ३.१५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर एका बाजूला ठेवण्यात आला. मात्र दोन दिवसांपूर्वी ड्युटीवरील यंत्रचालक मनोदय डोईजड यांना संबंधित रोहित्रातील ऑइल काही प्रमाणात सांडल्याचे आढळले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सर्वच ऑइल रोहित्रातून कोणीतरी सोडून दिल्याचा संशय आला. इचलकरंजी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी.पी. भणगे व मुल्ला यांनी पाहणी केली असता हा प्रकार चोरीसाठी केला असल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी तातडीने हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधून पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉइल चोरण्यासाठी चोरटे पुन्हा येऊ शकतात याची कल्पना पोलिसांना दिली. शनिवारी पहाटे तीन चोरटे रोहित्रातील तांब्याची कॉइल काढण्याच्या प्रयत्नात होते. दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी अचानक धावा करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता १ चोरटा हाती लागला. तर दोन फरार झाले. पकडलेल्या चोरट्याने फरार चोरांची नावे पोलिसांना सांगितली. हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणांत महावितरणचे २ लाख, ९७ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद मुल्ला यांनी दिली आहे.