रक्त संकलन पिशवी पुरवठ्यातील अनागोंदीने रक्तपेढ्या त्रस्त

पुरवठा बहुतांश वेळा वर्षाअखेरीस होत असतो.

|| दयानंद लिपारे
कालमर्यादा संपत आल्यावर पुरवठा :- कोल्हापूर : राज्यातील सेवाभावी रक्तपेढ्यांना शासनाकडून होणारा रक्त संकलन पिशव्यांचा पुरवठा हा अनियमित किंवा उशिरा होत आहे. गेल्या दोन वर्षांत ऐन करोना संसर्गाच्या काळात तर या पिशव्यांचा पुरवठाच न झाल्यामुळे या संस्थांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राज्यात रक्त संकलन करण्याचे काम शासकीय रुग्णालय, भारतीय रेड क्रॉस संस्था, स्वयंसेवी संस्था आणि गेल्या काही वर्षांत खासगी रक्तपेढी यांच्याकरवी केले जाते. यामध्ये दात्यांचे रक्त संकलन करण्यासाठी विशिष्ट पिशवी वापरली जाते. त्याला वैद्यकीय भाषेत ‘मदर बॅग’ असे संबोधले जाते. वर्षभर दात्यांकडून अंदाजे उपलब्ध होणाऱ्या रक्ताच्या प्रमाणात या पिशव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच शासन एका वेळेसच खरेदी करते. शासकीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये वापर होऊन ज्या पिशव्या शिल्लक राहतात, त्यापैकी काही पिशव्या या सेवाभावी रक्तपेढ्यांना शासनाकडून पुरवल्या जातात. मात्र हा पुरवठा बहुतांश वेळा वर्षाअखेरीस होत असतो. अनेकदा तोवर या पिशव्यांची वापर कालमर्यादा (एक्सपायरी डेट) ही संपत आली असल्याने त्याचा वापर करणे अशक्य बनते. अनेकदा या पिशव्या टाकून द्याव्या लागतात.

जर हा पुरवठा वर्षाच्या सुरुवातीपासूनच जर टप्प्याटप्प्याने केला तर तो या संस्थांना उपयोगी पडू शकतो, असे या संस्थाचालकांचे म्हणणे आहे. सध्या रक्ताची मोठी चणचण आहे, अशा वेळी हा साठा वाढवण्यासाठी या रक्तपेढ्यांना अशा प्रकारच्या सामग्रीचा सुरुवातीपासूनच योग्य पुरवठा केला, तर त्यातून रक्त संकलन वाढण्यास मोठी मदत होईल, असेही या संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

प्रशासकीय चलाखी

राज्य शासनाकडे शिल्लक राहिलेल्या पिशव्यांच्या वापराची मुदत (एक्स्पायरी डेट) संपत येऊ लागली आणि आपला साठा पडून असल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाकडून याचा पुरवठा सुरू केला जातो. यामध्ये वरकरणी रक्तपेढ्यांना मदतीची भावना दाखवली जाते, पण हा साठा रक्तपेढीपर्यंत पोहचेपर्यंत हाती अवघे एक ते दोन महिने उरतात. या काळात दाते पुरेशा प्रमाणात आले नाही तर या किमती पिशव्या निरुपयोगी ठरल्याने त्याचे मूल्य काहीच उरत नाही.

रक्तपिशव्या वेळेत देऊ

सेवाभावी रक्तपेढ्यांना शासकीय रक्त संकलन पिशव्या उशिराने मिळत असल्याने त्यांना कराव्या लागणाऱ्या विविध अडचणींची माहिती समजली. यापुढे हा पुरवठा वेळेवर होण्यासाठी पावले टाकली जातील. – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

नियोजनाची गरज

शासनाने सेवाभावी रक्तपेढ्यांना वर्षभरात टप्प्याटप्प्याने पिशव्या पुरवण्याचे धोरण स्वीकारले तर ते उपयोगी ठरेल. करोनाकाळात शासनाकडून पिशव्यांचा पुरवठा झाला नाही. दुसरीकडे खासगी रक्तपेढ्यांची स्पर्धा वाढली असल्याने सेवाभावी रक्तपेढ्या अडचणीत आल्या आहेत. त्यांना वेळेवर पिशव्यांची उपलब्धता झाली तर चांगला दिलासा मिळेल.     – व्ही. बी. पाटील, अध्यक्ष, राजर्षी शाहू रक्तपेढी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Blood banks suffer from chaos in blood collection bag supply akp