नव्या सत्ताधाऱ्यांची कसोटी

दयानंद लिपारे, लोकसत्ता

Why was Harvey Weinstein conviction overturned in the MeToo case
#MeToo प्रकरणातील अत्याचारी हार्वे वाइनस्टीन यांची शिक्षा रद्द का झाली? चळवळीला धक्का बसणार?
Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…
pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन

कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठय़ा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी गटाने गोकुळला देशातील सर्वात मोठय़ा ‘अमूल’च्या बरोबरीचे स्थान मिळवून देण्याची ग्वाही दूध उत्पादकांना दिली होती. विरोधातून सत्तेत आलेल्या नेतृत्व आणि संचालकांना ही वाट सोपी असणार नाही. अमूलचे आव्हान पेलण्यापूर्वी राज्यातील आणि देशातील दूध संघाच्या तोलामोलाचा कारभार करून दाखवावे लागणार आहे. त्यामुळे ही वाटचाल कठीण असून त्याला नवे सत्ताधारी कसे  सामोरे जाणार हा प्रश्न आहे.

‘गोकुळ’ जिंकण्याचे लक्ष्य बाळगताना गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बरीच आश्वासने सभासदांना दिली. निवडणुकीनंतर आता त्यांच्याकडे नेतृत्व आले आहे. ‘उक्ती आणि कृती’ याचा मेळ घालण्याचे आव्हान त्यांच्यासह संचालकांसमोर येऊन ठेपले आहे. दूध उत्पादकांना प्रति लिटर दोन रुपये दरवाढ, वासाचे दूध, कमी प्रतीचे दूध यातील आर्थिक पिळवणूक दूर करणे ही आश्वासने त्यांनी दिली होती. याचवेळी गोकुळला अमूल दूध संघाइतके उच्च स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी आश्वस्त केले होते. सत्तासूत्रे ताब्यात आल्यानंतर त्यांनी संचालकांच्या माध्यमातून फेरमांडणीला आरंभही केला आहे.

‘अमूल’ला गवसणी घालताना

अनेक बाबतीत दोन्ही दूध संघात लक्षणीय तफावत आहे. अमूल हा गुजरातमधील ३० दूध संघांची शिखर संस्था आहे. त्यांचे प्रतिदिन दूध संकलन पावणे तीन कोटी लिटर आहे. ५० टक्के दूध ते द्रवरूपात (पिशवी) विकतात, तर उर्वरित दूध मूल्यवर्धित प्रक्रिया करून दुग्धोत्पादनाची दीडशेहून अधिक उत्पादने तयार करून विकत असतात. स्वाभाविक अमूल दूध संघ हा अधिक नफ्यात आहे. गोकुळकडून सभासदांना एक रुपया उत्पादनातील ८२ पैसे परत केले जातात. ही रक्कम ७० पैसे अपेक्षित असून गोकुळ राज्यात सर्वाधिक रक्कम देते असा दावा केला जातो. गोकुळ दूध संघात ९० टक्के दूध द्रवरूपात विकले जाते. गोकुळमध्ये केवळ १० टक्के दुग्धपदार्थ केले जात असल्याने मूल्यवर्धितेचा लाभ घेण्याच्या बाबतीत गोकुळ अमूलच्या तुलनेत कोसो दूर आहे. अमूलच्या व्यवस्थापनाबाबत गैरव्यवहार झाल्याची चर्चा अपवादाने आहे. तुलनेने गोकुळमधील मलईदार कारभार हा सातत्याने चर्चेत राहिला आहे. याला आवर घालणे हे नव्या सत्ताधाऱ्यांसमोर आणखी एक आव्हान असून त्यांनी काही प्राथमिक पावले टाकली असली तरी मोठी मजल मारावी लागणार आहे. अमूलचे व्यवस्थापन हे पूर्णत: व्यवसायिक असून तिथे अभ्यासू प्रशासन, अधिकारी आहेत. गोकुळमध्ये अनुभवी संचालक असले तरी अभ्यासू संचालक अशी प्रतिमा निर्माण करणे प्रयत्नसाध्य आहे. अभ्यासू अधिकारी सेवानिवृत्तोत्तर सेवेत आहेत. त्यांना बदलण्याचे संकेत आहेत. त्या क्षमतेचे नवे अधिकारी नियुक्त करतानाही पारख करावी लागणार आहे.

राज्यातही मोठी स्पर्धा

अमूलशी स्पर्धा करण्यापूर्वी देशातील आणि राज्यातील अन्य सक्षम दूध संघांच्या बरोबरीने जाणे हेही गोकुळसाठी कठीण असणार आहे. देशातील मदर डेअरी, क्वालिटी दूध संघ, ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक (नंदिनी), तमिळनाडू (अविम), केरळ (मीलमा) गुजरात (दूध सागर), डायनॅमिक्स अशा मातबर दूध संघांपर्यंतचे पोहोचणे हेही दिव्य असणार आहे. राज्याचा विचार करता येथे ६० टक्के दूध हे खासगी संघांचे, ४० टक्के  सहकारी संघाचे असून एक टक्का दूध राज्य सहकारी शिखर संस्थेचे आहे. सहकारी दूध संघात सर्वाधिक वाटा गोकुळचा असून सद्य:स्थितीला तो १४ लाख लिटरचा असून २० लाख लिटरची विस्तारक्षमता आहे.

राज्यात चितळे, प्रभात, सोनई, पराग, डायनॅमिक्स अशा खासगी दूध संघांशी तुल्यबळ स्पर्धा करावी लागणार आहे. यातील बहुतेक सर्व संघ ५० टक्के दूध द्रवरूपात तर उर्वरित मूल्यवर्धित दुग्धपदार्थ करून विकत असल्याने अधिक नफा कमावतात. याही स्पर्धेला गोकुळला दोन हात करावे लागणार आहेत.

अमूलची उंची गाठताना राज्यातील खाजगी दूध संघ आणि देशातील अन्य प्रमुख दूध संघ यांच्या बरोबरीला उतरण्याच्या दृष्टीने गोकुळमधील नव्या नेतृत्वाला आणि संचालकांना कंबर कसून काम करावे लागणे अपरिहार्य ठरणार आहे.