scorecardresearch

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीचा आढावा; कोल्हापूर जिल्ह्यात पूर व्यवस्थापन आढावा बैठक; सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

“पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल”, असे त्यांनी सांगितले आहे.

panchaganga river
कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.

कोल्हापूर: जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरध्वनीद्वारे सद्यस्थितीची माहिती घेतली. “पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल”, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच एनडीआरएफच्या 2 तुकड्या आज रात्री जिल्ह्यात दाखल होत आहेत, असे सांगून पूरपरिस्थिती उद्भवल्यास सर्वांनी दक्ष राहून आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात,’ अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी  रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली पूर व्यवस्थापन आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नितीन देसाई, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, संततधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून सध्या पाणीपातळी 26 फुटांवर आहे, तर जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पब्लिक अड्रेस सिस्टीम व अन्य माध्यमांद्वारे जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची अद्ययावत माहिती नागरिकांपर्यंत जलदगतीने पोहोचवा. पुरबाधित नागरिक व जनावरांचे वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. स्थलांतरितांच्या कॅम्पमध्ये नागरिकांना अन्न, पाणी, विद्युत पुरवठा, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा आदी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ठिकाणे निश्चित झाली असून जनावरांना हलवण्यासाठी वाहनांची माहिती पशुपालकांना द्या. पुराच्या पाण्यात पंप बुडून पाणीपुरवठा बंद झाल्यास टँकरने पाणीपुरवठ्याची सोय करा. घाटमाथ्यावर पावसाचे पाणी अडून भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी वनविभागाने घाटमाथ्यावरील पाण्याचे स्रोत मोकळे करावेत.

रस्त्यावर पुराच्या पाणी आल्यास याठिकाणी वाहने अडकून दुर्घटना घडू नयेत, यासाठी याठिकाणी दोन्ही बाजूला पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्याबरोबरच बॅरिकेड्स लावा. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त भाजीपाला व दुग्धसाठा तयार ठेवण्याबाबत दुग्धजन्य संस्थांना कळवा, अशा सूचना देवून पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने विभागनिहाय कामाचा आढावा जिल्हाधिकारी रेखावार यांनी घेतला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. माहिती हवी असल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या  १०७७ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. पूरपरिस्थिती उद्भवल्यास यंत्रणा सज्ज असल्याचे सर्व विभागप्रमुखांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde flood situation flood management review meeting ysh

ताज्या बातम्या