कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा आखाडा गाजू लागला असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्यालाच शुभमुहूर्ताचा गतिरोधक निर्माण झाला आहे. पिळदार शरीरयष्टी आणि तगडा जनसंपर्क याच्या जोरावर मदान मारण्याची तयारी असलेले उमेदवारही पितृपक्षाच्या अडथळ्याने पार बेजार झाले आहे. उमेदवारी अर्जासाठीचा मुहूर्त हा पुरोगामित्वाची शेखी मिरवणाऱ्या कोल्हापूरच्या परंपरेला आव्हान मिळाले आहे. मुहूर्त पाहूनच पाऊल पुढे टाकणाऱ्या भाजप-सेनेने पितृपक्ष संपल्यानंतर मिळणाऱ्या एकमेव दिवसावर अर्ज सादर करण्याचे ठरविले आहे, तर नेहमी पुरोगामित्वाचा डांबोरा पिटणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने वळसे घेत असेच धोरण राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे डावे वगळता इतर उमेदवारांची पितृपक्षांनी चांगलीच गोची केली आहे.
कोल्हापूरची भूमी ही पुरोगामी नगरी म्हणून ओळखली जाते. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या नगरीत अनेक पुरोगामी निर्णय घेतले होते. त्यांचा वसा अनेक विचारवंत, अभ्यासकांनी चालविला. आजही ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांच्या सारख्यांनी कोल्हापूरच्या पुरोगामी चळवळीला उंचीवर नेण्याचे काम करत आहेत. अशा या पुरोगामी नगरीला महापालिका निवडणुकीत आव्हान मिळताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ६ ऑक्टोबरला सुरू होणार आहे, तर १३ ऑक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करणे ही उमेदवारांच्या दृष्टीने पहिली महत्त्वाची पायरी असते. सध्या, पितृपक्ष सुरू झाला आहे. या पंधरवडय़ामध्ये शुभकार्य त्याज्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे पितृपक्ष हा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या दृष्टीने प्रथमाग्रास मक्षिकापात ठरला आहे. लवकर अर्ज दाखल करून प्रचाराची मोहीम उघडण्याची तयारी असताना नेमका पितृपक्ष मध्ये आल्याने अर्ज कसा भरायचा, याची विवंचना पुरोगामी नगरीतील भावी नगरसेवकांना लागून राहिली आहे. भाजपासारख्या पक्ष संस्कृती-परंपरा पाळणारा असल्याने त्यांचे मुहूर्ताकडे लक्ष असते. या पक्षाचे उमेदवार व श्री महालक्ष्मीचे श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी आपली शुभ मुहूर्तावर श्रद्धा असल्याचे नमूद करीत चांगला दिवस पाहूनच अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. पक्षाचे शहर उपाध्यक्ष व उमेदवार विजय जाधव यांनीही याच मताची रीघ ओढत पितृपक्ष संपल्यानंतर मिळणाऱ्या एकमेव दिवसात अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने पितृपक्ष सुरू होण्यास काही तासांचा अवधी उरला असताना पहिली उमेदवारी यादी जाहीर करून मुहूर्त साधल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp declare first candidate list for kolhapur civic body election
First published on: 01-10-2015 at 03:42 IST