करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरावं अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने ‘ माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आंदोलन करताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याने ५० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी केली आहे.

“जोपर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री रस्त्यावर उतरुन संवाद साधत नाहीत तोपर्यंत गोष्टी सुधारणार नाहीत. सर्व काळजी घेऊन त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि लोकांना सांगितल पाहिजे की, आम्ही प्रशासनाच्या बैठका घेत आहोत, विरोधी पक्षांसोबत बैठका घेत आहोत. त्यांनी जिवावर उदार व्हावं असं म्हणत नाही. सगळी काळजी घेऊन ते रस्त्यावर उतरणार नाहीत तोपर्यंत यंत्रणा हालणार नाही. बाहेर फिरताना अनेक गोष्टी, चुका लक्षात येतात,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राज्य सरकार पूर्णपणे निष्क्रिय, एकही नवा पैसा खर्च करण्यास तयार नाही – देवेंद्र फडणवीस

“गेल्या ६० दिवसांत मुख्यमंत्री घराबाहेर पडायला तयार नाहीत. मातोश्री हे मुख्यमंत्री निवासस्थान असू शकत नाही. वर्षा आवडत नसेल तर त्यांनी इतर कोणती जागा निवडावी. परंतू सरकारी निवासस्थानीच राहिलं पाहिजे. मातोश्री कॉलनीतील लोकांना किती त्रास होत असेल याचा विचार करा. सर्व सरकारी अधिकारी, नेत्यांनी उठून मातोश्रीवर जायचं,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

राज्य सरकारने पुढील दोन तीन महिन्यांसाठी कामगार, मजूर, श्रमिक, सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे असं सांगताना चंद्रकांत पाटील यांनी ५० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा अशी मागणी केली आहे.

आणखी वाचा- सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आपण लढाई जिंकू असं सरकारला वाटत आहे – देवेंद्र फडणवीस

“केरळची रुग्णसंख्या ६० दिवसात ६०० च्या वर गेली नाही आणी राज्यातील रुग्णसंख्या ४० हजाराच्या वर गेली आहे. यावरुन महाराष्ट्र सरकार अपयशी ठरली असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पोलिसांवरील हल्ले वाढत आहेत. दोन महिने आम्ही सरकारला सहकार्य केलं. पण सरकार आपली काही भूमिका बजावणार नाही, काम करणार नाही आणि सहकार्य करा असं म्हणणार असेल तर हे बरोबर नाही. राज्य सरकारनेही आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे. आरोग्य व्यवस्था नीट करण्यासाठी एकत्रित रचना केली पाहिजे,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.