एका पाठोपाठ होणारी चौकशी सत्रे, बदलून न मिळालेल्या जुन्या नोटा याच्या चिंतेत असणाऱ्या जिल्हा बँका आता रोकड स्वरुपाच्या चलन तुटवडय़ानेही त्रस्त झाल्या आहेत. स्थानिक ‘करन्सी चेस्ट बँकां’कडून जिल्हा बँकेला आवश्यक पतपुरवठा होत नसल्यामुळेच ग्राहकांची गरसोय होत आहे. एका कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दररोज ३० ते ३५ कोटी रुपयांची रोकड आवश्यकता असताना ‘करन्सी चेस्ट बँके’कडून केवळ २ ते ५ कोटी रुपयेच मिळतात. यामुळे ग्राहकांना तोंड देताना प्रशासनाला नाकीनऊ येत आहे .

नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोकड भरण्यात काळेबेरे होण्याच्या शक्यतेने जिल्हा मध्यवर्ती बँकाना चलनातून रद्द ठरवलेल्या नोटा स्वीकारण्यास रिझव्‍‌र्ह बँकेकडून मज्जाव करण्यात आला. त्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकांनी  सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आमच्या बँकिंग व्यवहाराच्या मुळावर येणारे निर्णय घेतला असल्याची कैफियत मांडण्यात आली. न्यायायलाने ग्राहकांची ‘केवायसी’ तपासून  जिल्हा बँकाना रोकड भरून घेण्यास अनुमती दर्शवत दिलासा दिला. दरम्यान पुढे सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या मागे चौकशीचे सत्र सुरु झाले. तपासणीचा ससेमिरा गेल्या आठवड्यापर्यंत कायम होता. आता त्यामध्ये या चलन तुटवडय़ाच्या नव्या समस्येची भर पडली आहे.

गरजेपेक्षा अल्प रोकड पुरवठा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या जिल्ह्यात १९१ शाखा आहेत. या शाखांमधून दररोज शेतकऱ्यांचे पीक कर्ज वितरण, मध्यम मुदत कर्ज वितरण, दूध बिले, शिक्षक पगार, पेन्शन वाटप असे विविध प्रकारांच्या वाटपासाठी दररोज ३० ते ३५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे . तथापि, प्रत्यक्षात जिल्हा बँकेला केवळ २ ते ५ कोटी रुपयेच मिळत असतात. त्यामुळे ग्राहकांची गरसोय होऊ लागली आहे. यातूनही लोकांची गरसोय होऊ नये म्हणून कर्मचारी प्रयत्नशील आहेत. पुरेशी रोकड मिळत नसल्याने बँक कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे .

रोकड मागणीत वाढ

चौकशीच्या सततच्या माऱ्याला सामोरे जावे लागत असताना या बँकांना दुसरीकडे पुरेशी रोकड कशी मिळवायची याची चिंता लागून राहिली आहे. लग्नसराई, घरबांधणी, सहली, विविध प्रकारची खरेदी यासाठी बँकेच्या ग्राहकांना रोख रकमेची  गरज भासत आहे . त्यासाठी तो बँकेकडे चकरा मारत असल्याचे चित्र बँकाच्या दारासमोर दिसत आहे .  महानगरामध्ये  करन्सी चेस्ट बँकांकडून जिल्हा बँकेला आवश्यक पतपुरवठा होत आहे पण अन्यत्र मात्र रोकड टंचाईअभावी जिल्हा बँकांचे व्यवहार मंदावले आहेत .

कॅशलेसचा पर्याय

या चलनटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा बँकेने कॅशलेस व्यवहारासाठी गेल्या वर्षांपासून ग्राहक व शेतकरीवर्गासाठी रुपे डेबिट, तसेच किसान क्रेडिट कार्डाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुमारे १ लाख ४५ हजार लोकांना या बँकेने  कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. या कार्डाचा वापर पेट्रोल पंप, खत खरेदी, दुकानदार, मॉल अशा विविध ठिकाणी वापर करून आíथक व्यवहार करण्यास उपयुक्त आहेत. याशिवाय  आरटीजीएस, एनईएफटी या सुविधांचा वापर करून  कॅशलेस ट्रॅन्झ्ॉक्शन करण्याकडे कल  वाढत आहे, असे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.