कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरल्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती उफाळून आली असून, विधानपरिषदेच्या एका जागेसाठी विद्यमान सदस्यासह तब्बल चौघांनी दावा ठोकला आहे. यातही राजकीय उट्टे काढण्यातून शह-प्रतिशहाच्या डावपेचांना ऊत आला आहे. यातून काँग्रेसअंतर्गत गटबाजीचे ध्रुवीकरण होण्याच्या दृष्टीने पावले पडू लागली असून त्याचे दूरगामी परिणाम संभवत आहेत.
विधानपरिषदेच्या (स्थानिक स्वराज्य संस्था) या जागेवर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा डोळा आहे. विधान सभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. मागील दाराने आमदार होण्याची संधी गमावल्यानंतर आता पुढील दाराने हे पद मिळवण्याच्या दृष्टीने चाचपणीबरोबरच आपले उमेदवारीचे प्यादे पुढे सरकवण्याची अहमहमिका काँग्रेसच्या जिल्ह्यातील चार नेत्यांना लागली आहे.
विद्यमान सदस्य आमदार महादेवराव महाडिक यांनी चौथ्यांदा ही निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. त्यांच्या मार्गात काटे पेरलेले आहेत. महापालिका निवडणुकीत महाडिक यांनी काँग्रेस विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीला छुपे पाठबळ दिल्याचा जाहीर आरोप जिल्हा काँग्रेस भवनातील बठकीवेळी करण्यात आला. महाडिक यांनी याचा इन्कार केला आहे. तर त्यांच्या समर्थकांनी पक्षविरोधी कारवायांचे पुरावे सादर करावेत, असे आव्हान दिले आहे. या स्थितीत महाडिकांच्या गळय़ात पुन्हा उमेदवारीची माळ कितपत पडणार याविषयी साशंकता आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना पराभवाला तोंड द्यावे लागले. सत्तेविना काँग्रेसजन फार काळ लांब राहू शकत नाहीत, हा निष्कर्ष विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सदर तीन माजी आमदारांनी उमेदवारी मिळवण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नातून प्रत्ययास येतो. जिल्हाध्यक्षांनी आपणच खरे पक्षनिष्ठ आहोत, असा दावा केला आहे. तर महापालिका विजयाचे शिल्पकार ठरलेल्या सतेज पाटील यांनी जिल्हाभर आपला वट असल्याचे म्हटले आहे. तर हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील राजकीय वजन व मते आपल्या बाजूंनी असल्याचे आवाडे यांचे म्हणणे आहे. या आधारे तिघांनीही उमेदवारी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न जारी ठेवले आहेत.
याच वेळी काँग्रेसअंतर्गत राजकीय हिशोब चुकवण्याची संधीही साधली जात आहे. महाडिक यांचे वाढते वर्चस्व सतेज पाटील यांना मोडून काढायचे आहे. पाटील यांचा विजयाचा वारू रोखण्याचा इरादा महाडिक यांनी व्यक्त केला आहे. त्यातून त्यांनी आपणास उमेदवारी नसेल तर जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील वा आवाडे यांना उमेदवारी द्यावी, असे मत मांडले आहे. जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी इच्छुक असलेले आवाडे हे आणखी एक डाव करीत आहेत. महाडिक-पाटील-आवाडे यांची संयुक्त बठक होऊन सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न झाला. मात्र तिघांतील राजकीय संबंध पाहता त्यातून फारसे काही निष्पन्न न होता आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त करीत पाटील यांनी महाडिक यांच्या बरोबरीने जिल्ह्यात प्रचार सुरू ठेवला असून, कुरघोडीच्या राजकारणातून कोणाची फत्ते होते याकडे लक्ष लागून राहिले आहे. या तुलनेत विरोधी गोटात मात्र कमालीची शांतता आहे.