कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीवरून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या मोर्चावेळी जिल्हाधिकारी अमित सनी व मोर्चाचे संयोजक आमदार हसन मुश्रीफ यांच्यात वाद निर्माण झाला. आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. तर त्यांच्या या कृत्याचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह नेत्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी सनी यांच्याविरुद्ध आगामी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर या पक्षाच्या आमदार द्वयींनी पत्रकारांना सांगितले.
बांधकाम, घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाची परवानगी काही दिवसांपूर्वी दिली होती, मात्र यानंतर आचारसंहिता लागल्याने परवानगी नाकारली, मात्र आज सकाळी पुन्हा परवानगी दिली. दसरा चौकातून मोर्चास प्रारंभ झाला, फोर्ड कॉर्नर व्हीनस कॉर्नर माग्रे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. तसेच शिष्टमंडळास भेटण्यासही नकार दिला.
जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळास भेटण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांसह आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांनी प्रवेशद्वार ढकलून आत प्रवेश केला. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास व शिष्टमंडळास भेट देण्यास नकार दिल्याने कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन केले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
राज्य निवडणूक सचिवाशी संपर्क
जिल्हाधिकारी सनी यांनी आचारसंहितेचे कारण पुढे केल्याने आमदार मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी निवेदन का स्वीकारू शकत नाहीत याचा लेखी खुलासा मागितला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या मुश्रीफांनी थेट राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सहारिया यांच्याशी मोबाइलवरून संपर्क केला. मात्र सहारियांचा फोन घेण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला.
जिल्हाधिकारी शिष्टमंडळास भेटण्यास तयार नाहीत तर आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा व निवडणूक अधिकारी संगीता चौगुले यांची जिल्हाधिकारी व आंदोलकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली. दोघांनीही आपल्या परीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही आपल्या मतावर ठाम राहिले. बांधकाम कामगारांच्या योजना बंद केल्याच्या निषेधार्थ दिवाळीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर भव्य मोर्चा काढणार असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगीतले.