विज्ञान, संशोधन क्षेत्रात भारत अमेरिकेपेक्षाही मोठे काम करीत आहे. पंतप्रधानांची यासंदर्भात उच्च अशी आश्वासक भूमिका असल्याने विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन कार्याला अधिकाधिक प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी अपेक्षित निधीमध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जात नसल्याचे केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
कराडनजीकच्या हजारमाची येथील भूकंप संशोधन केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज सोमवारी समारंभपूर्वक करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, कार्यक्रमस्थळी प्रकल्प प्रतिकृतीच्या माध्यमातून येथे साकारत असलेल्या सुमारे ४७० कोटी रुपयांच्या भूसंशोधन प्रकल्पाची माहिती डॉ. हर्ष वर्धन व अन्य मान्यवरांना देण्यात आली.
आजचे येथील विधीवत भूमिपूजन अंधश्रध्देला खतपाणी घालणारे नाही का? असे डॉ. हर्ष वर्धन यांना पत्रकारांनी छेडले असता, कृपा करून दिशाभूल करून नका, काळाची गरज म्हणून इथे उभारत असलेल्या या संशोधन प्रकल्पाकडे पहा. हे परंपरेने चालत आहे. परमेश्वराखेरीज सर्व व्यर्थ म्हणावे लागेल. आम्ही परमेश्वराचे नमन करून आमच्या हातून या राष्ट्राची उत्तुंग सेवा व्हावी म्हणून प्रार्थना करीत असतो असे ते म्हणाले.
विज्ञान, संशोधन कार्यात अमेरिकेच्या कामाची मोठी चर्चा असली तरी भारतही त्यापेक्षा यासंदर्भात मोठे काम करीत आहे. प्रत्येक देशाची एक ठरलेली व्यवस्था असते. प्रत्येक देशापुढे समस्या असतात. मिळणाऱ्या उत्पन्नातून अनुकूल व सकारात्मक विकासावर पैसा कसा उपयोगात आणायचा याचा विचार केला जातो. आणि या संदर्भात आमचे संशोधक शिकले आहेत. विज्ञान विभागासाठी होणाऱ्या खर्चात शासन कोणत्याही प्रकारची कपात करीत नाही. पंतप्रधानांची यासंदर्भात खूप मोठी व उच्च अशी आश्वासक भूमिका आहे. आजचे इथलेच उदाहरण घेता, आम्ही या डोंगरात ४७० कोटींचा भूगर्भ संशोधनाचा प्रकल्प उभारतो आहे. यावरूनच केंद्र सरकारची विज्ञान, तंत्रज्ञान यासंदर्भातील मोठी सकारात्मक दृष्टी स्पष्ट होते, असे वर्धन यांनी सांगितले.