दयानंद लिपारे
कोल्हापूर : राज्यसभा निवडणूक प्रक्रियेचा केंद्रिबदू म्हणून आजही कोल्हापूर केंद्रस्थानी राहिले. संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेतली असल्याने शिवसेनेचे संजय पवार हे निश्चित झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपने माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे. सर्वात आधी चर्चेत असून गळालेले नाव आणि आता अनपेक्षितपणे पुढे आलेली दोन्ही नावे एकाच ठिकाणची असल्याने या निवडणुकीत कोल्हापूरचीच चर्चा केंद्रस्थानी राहात आहे.
राज्यसभा निवडणूक जाहीर झाली त्याच्या अगोदरपासून संभाजीराजे छत्रपती यांनी तयारी सुरू केली होती. त्या दृष्टीने त्यांचे तसे विविध पक्षांशी भेटीगाठीचे प्रयत्नही सुरू झाले होते. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर जिंकून येण्याची शक्यता आघाडीकडून असल्याने त्यांनी त्या दृष्टीने आघाडीशी संपर्क वाढवला होता. विशेषत: शिवसेनेशी संधान साधण्यास सुरुवात केली होती. मात्र शिवसेनेने ही आमच्या पक्षाच्या वाटय़ाची जागा असल्याने पक्ष प्रवेशाची अट समोर ठेवली. ती मान्य न झाल्याने अखेर त्यांचे नाव मागे पडले आणि आता तर संभाजीराजे यांनी या निवडणुकीतून माघारच घेतली.
दरम्यान, संभाजीराजे यांच्या नावात बदल करायचा झाल्यास प्रादेशिक अस्मिता आणि जातीचा मुद्दा लक्षात घेत शिवसेनेने कोल्हापूरच्याच आणि मराठा जातीतील असलेल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीने कोल्हापूर पुन्हा चर्चेत आले. संजय पवार यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केला.
महाडिक उमेदवारीचे दावेदार
आघाडीतील उमेदवारीवरून सुरू असलेला गोंधळ लक्षात घेत भाजपही सक्रिय झाला असून त्यांनीही सहावी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिसरी जागा लढवून जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. याकरिता आमदार पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीसाठी प्राधान्य दिले असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे महाराष्ट्राऐवजी गुजरातमधून निवडून येण्यास प्राधान्य देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास महाडिक यांची उमेदवारी आणखी पक्की होऊ शकते.
भाजपकडे असलेली मते, अपक्ष आमदार आणि काही हाती लागणारे आमदार या अतिरिक्त मतांच्या आधारे तिसरा उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती आहे. असे झाल्यास महाडिक यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेबरोबरच त्यांची राज्यसभेत जाण्याची शक्यताही वाढीस लागल्याचे दिसते.याकरिता ते शनिवारी मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येते.
लोकसभेसाठी उमेदवाराचा शोध
भाजपचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून महाडिक यांच्याकडे पाहिले जाते. या मतदारसंघात त्यांनी तीन वेळा निवडणूक लढवली आहे. त्यापैकी एकदा ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विजयी झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते भाजपचे प्रबळ उमेदवार म्हणून चर्चेत असताना त्यांची आता राज्यसभेसाठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या निवडीमागेही कोल्हापूर हेच मुख्य कारण आहे.
शिवसेना उमेदवारी कायम
आजची घडामोड संजय पवार यांच्यासाठी उपयुक्त ठरली आहे. सुरुवातीपासून त्यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात होती. त्यांची उमेदवारी ‘डमी’ असल्याची चर्चा होती. त्यावर पवार यांनी ‘डमी’ असो की खरी उमेदवारी; पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आपली भूमिका राहील असे स्पष्ट केले होते. तथापि सेनाप्रमुख ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा अर्ज दाखल केला गेला आहे. तर दुसरीकडे आज संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी संभाजीराजे हे शिवसेना वा आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात येण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे स्पर्धक उमेदवाराची भीती कमी झाल्याने संजय पवार हे आता उमेदवारीबाबत निश्चिंत झाले आहेत.