आर्थिक मदतीचे शासनाला आवाहन

यंत्रमागधारकाने कर्जास कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेचे पडसाद मंगळवारी इचलकरंजीत उमटले. इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने धंदले कुटुंबीयांना शासनाने दहा लाख रुपयांची आíथक मदत द्यावी, अशी मागणी करतानाच यंत्रमागधारकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले, तर शहरातील यंत्रमागधारकांनी भविष्यात अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वस्त्रोद्योगातील समस्यांकडे शासनाने तातडीने व गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. शिवाय बुधवार (२७ जुल) पासून पाच दिवस प्रांत कार्यालय चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी, वस्त्रोद्योगात निर्माण झालेल्या समस्या आणि मंदीमुळे ज्याची भीती होती ती खरी ठरल्याचे नमूद करून आगामी काळात व्यवसायाला चांगले दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंत्रमागधारकांनी धीर न सोडता संयम बाळण्याचे आवाहन केले. पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने वस्त्रोद्योगातील अडचणी सोडविण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, पण सरकारकडून चालढकल केली जात आहे. यंत्रमाग व्यवसायाला संकटाच्या गत्रेतून काढण्यासाठी आम्ही काही मागण्या वस्त्रोद्योग मंत्र्यांसह आयुक्तांकडे तसेच दिल्ली दरबारीही मांडल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रतियुनिट २ रुपये दराने यंत्रमागासाठी वीज पुरविण्याबाबत तातडीने निर्णय होण्याची गरज आहे. तसेच बँकांकडून दिले जाणारे कर्ज हे ७ टक्के व्याजदराने मिळावे हीसुध्दा प्रमुख मागणी आहे. शिवाय कापड निर्यातीलाही प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. या मागण्यांची तातडीने निर्गत झाल्यास यंत्रमाग व्यवसायावरील संकट काही अंशी दूर होण्यास मदत मिळेल.  दरम्यान, असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात, धंदले यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने दहा लाख रुपयांची मदत करावी. त्याचबरोबर बँक ऑफ इंडियाकडून दहा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, सोमा वाळकुंजे, प्रमोद महाजन, सुरेखा इंगवले, हमिदा गोरवाडे, भारत मुरदुंडे, नारायण दुरुगडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

शहरातील यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात, यंत्रमाग व्यवसायातील बिकट परिस्थितीला कंटाळून धंदले यांनी आत्महत्या केली. भविष्यात अशा घटनांची शक्यता नाकारता येत नाही. सरकारचे वस्त्रोद्योगाकडे दुर्लक्ष आणि वाढत्या समस्या यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. पुन्हा अशा घटना घडल्यास या संवेदनशील गावात पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनानेही या संबंधी लक्ष पुरवून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, शिवाय आपणही सर्वपक्षीय मिटिंग बोलावून या संदर्भात मार्ग काढावा असे नमूद केले आहे. या शिष्टमंडळात जीवन बरगे, जर्नादन चौगुले, सचिन भुते, अमोद म्हेतर, दीपक पाटील, शामराव गवळी, रामचंद्र हावळ, रमेश किल्लेदार, दत्तात्रय गवळी यांच्यासह कारखानदारांचा समावेश होता.