सोमवारपासून बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर तेथील मराठी भाषकांनी सोमवारी महामेळाव्याचे आयोजन केले असून, त्याला रविवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. तथापि, कर्नाटक सरकारला मराठी भाषकांची ताकद दाखवून देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सोमवारी (दि.२१) महामेळावा भरवणारच, असा वज्रनिर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. प्रशासकीय दबाव झुगारून देऊन बेळगाव येथील व्हॅक्सिन डेपोतील नियोजित महामेळाव्यास्थळी मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून,  रात्री उशिरापर्यंत एकीकरण समितीचे कार्यकत्रे परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत होते.

बेळगावसह सीमाभागातील जनता गेली ६० वष्रे महाराष्ट्रात समावेश व्हावा, या हक्कासाठी लढत आहे. कर्नाटक शासन मात्र या भागात कानडीकरणाचा वेग वाढवत आहे. त्यासाठी हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे भरवले जाते. याला मराठी भाषकांचा विरोध असतो. अधिवेशनच्या वेळी महामेळावा घेऊन तो प्रकट केला जातो. यंदाही त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटकी अधिवेशनाला चोख प्रत्युत्तर देण्याकरिता महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे आणि महाराष्ट्रात जाण्याच्या तीव्र भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

बेळगाव जिल्हा प्रशासनाने महामेळाव्याला ‘खो’ घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालवले आहेत. परवानगी देण्याबाबत वेगवेगळय़ा पातळय़ांवर म. ए. समिती नेत्यांना गोत्यात आणण्याचा डाव आखण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. जागामालकाची परवानगी घेतल्याशिवाय महामेळावा भरविण्यास परवानगी देणार नाही, अशी ‘कुत्सित’ भूमिका जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी घेतली आहे. मराठी भाषकांत संभ्रम निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कानडी संघटनांनी कंबर कसली आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या दबावाला न घाबरता व्हॅक्सिन डेपोतील नियोजित महामेळावा स्थळी सकाळी मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आमदार संभाजी पाटील आणि माजी आ. मनोहर किणेकर यांनी पूजा करून मुहूर्तमेढ रोवली आहे. या वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. समिती नेते दीपक दळवी, खानापूरचे आ. अरिवद पाटील, प्रकाश मरगाळे, एस. एम. बेळवटकर, दत्ता उघाडे, राजेंद्र मुतगेकर, राजू मरवे, विकास कलघटगी, मदन बामणे, महादेव पाटील, आर. आय. पाटील, पीयूष हावळ  पी. एच. पाटील आदींसह अनेक मराठी भाषक नागरिक या वेळी उपस्थित होते.