कोल्हापूर : खासदार संभाजी राजे हे छत्रपती घराण्यातील असल्याने ते आपल्या पक्षात यावेत असे प्रत्येक पक्षाला वाटणे स्वाभाविक आहे, असा उल्लेख करीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे नवी राजकीय वाट चोखाळतील असे संकेत दिले. याचवेळी त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नसल्याचे नमूद करताना ते कॉंग्रेस पक्षाशी हातमिळवणी करणार नाहीत, असेही मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सूचित केले.
खासदार संभाजीराजे यांनी ३ मे रोजी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर नवी राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यांच्या नव्या खेळीच्या या अनुषंगाने विचारणा केली असता मंत्री पाटील म्हणाले,की संभाजीराजे यांच्याशी मराठा आंदोलन, सारथी, मराठा आरक्षण, शाहू स्मृती शताब्दी कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित करणे आदी प्रश्नांवर चर्चा झाली आहे. ते छत्रपती घराण्यातील असल्याने प्रत्येक पक्षाला ते आपल्या पक्षात यावे असे वाटण्यात काही गैर नाही. यापूर्वीही त्यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे.
..म्हणून मालोजीराजे सक्रिय
राजकारणापासून दूर असणारे मालोजी राजे काँग्रेस पक्षात सक्रिय कसे झाले, असे विचारले असता पाटील म्हणाले, कोल्हापूर पोटनिवडणूक वेळी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली होती. यासाठी मी स्वत: त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून काँग्रेसचा प्रचार करण्याची केलेली विनंती त्यांनी स्वीकारल्याने काँग्रेस उमेदवार निवडून येण्यास फायदा झाला, असेही त्यांनी मान्य केले.
शाहूराजांचे स्मारक साकारणार
शाहू मिलमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक साकारण्याचा आराखडा तयार आहे. शासन निधीची उपलब्धता करत असून कामाला लवकरच सुरुवात केली जाईल. त्यातील ७० टक्के भाग वारसाहक्क जागेत येत नसल्याने काम गतीने पूर्ण होईल. कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ विकसित करण्याच्या कामात वारसाहक्क स्थळाच्या जागेचा प्रश्न होता. त्याचे निराकरण झाले असल्याने तेही काम गतीने पूर्ण होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.