दयानंद लिपारे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या राजकारणाचे नवे शिवार आता विधान परिषदेच्या माध्यमातून फुलणार आहे. शरद पवार यांच्याशी त्यांनी संघर्षांचे टोक गाठले होते; त्यांच्याच सहकार्याने आता ते या नव्या राजकीय शिवारात मशागत करणार आहेत. दोन वेळा खासदार झालेले राजू शेट्टी पुन्हा अकरा वर्षांंनंतर विधिमंडळ सदस्य होण्याची चिन्हे आहेत. यानिमित्ताने पवार – शेट्टी यांची जवळीक वाढली असून यावरून चर्चेलाही आणखी तोंड फुटले आहे.

शरद जोशी यांचे पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्यात शेट्टी यांचाही समावेश होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळवून देण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे ते शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यातून जिल्हा परिषद सदस्य, लगोलग शिरोळ विधान मतदारसंघात आमदार, सलग दोन वेळा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार असा चढत्या भाजणीचा राजकीय प्रवास त्यांनी केला.

गेल्या वेळी त्यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीशी जवळीक केली.  यामध्ये विशेष करून शरद पवार यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. हातकणंगले मतदारसंघात गतवेळी शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्याकडून शेट्टी यांचा लाखभर मतांनी पराभव झाला. या पराभवानंतरही काही वेगळेच मुद्दे चर्चेत आणले गेले. महाविकास आघाडीची सत्तासाथ करत असताना स्वाभिमानीने विधान परिषदेची एक जागा द्यावी, अशी मागणी केली होती.

प्रश्न राजकीय डावपेचाचा

मागील विधान परिषद निवडणुकीत या मागणीला डावलण्यात आले. त्यावर शेट्टींसह स्वाभिमानीच्या वर्तुळातून नाराजी व्यक्त करण्यात आली. आता राज्यपाल कोटय़ातून विधान परिषदेत नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे हे नवे आमदार कोण असणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी सत्तारूढ गटाकडून यादी गेली की राज्यपाल खळखळ न  करता मान्यता देत असल्याचे चित्र निदान महाराष्ट्रात तरी पाहायला मिळाले होते. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री यांचे राज्यपाल कोश्यारी यांच्याशी जमत नसल्याच्या अनेक घटना अलीकडे दिसून आल्या आहेत. आता राज्यपाल कोटय़ातील सदस्य नियुक्ती ही सर्वस्वी कोश्यारी यांचा निर्णय अंतिम असणार आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी लागणारे निकष पूर्ण करणाऱ्यांनाच विधान परिषदेची ही संधी मिळू शकते. याबाबी लक्षात घेऊन शरद पवार यांनी विधिज्ञांशी चर्चा-मसलत केल्यानंतर शेट्टी यांचे नाव यामध्ये समाविष्ट होऊ शकते का याची शक्यता अजमावली. नंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शेट्टी यांच्याकडे प्रस्ताव घेऊन पाठवले. त्यावर अंतिम चर्चा करण्यासाठी काल शेट्टी यांनी पवार यांची भेट घेतल्यावर पवार यांनी त्यांचा सत्कार करून जणू राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून ते निवडून आल्यासारखे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा शेट्टी हे विधानसभेत नसले तरी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकीचा टिळा लावून शेतकरी चळवळीची बांधणी करू शकतात.

अर्थात यालाही काही राजकीय संदर्भ आहेत. शेट्टी यांचे जिवलग मित्र सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली. तेव्हा भाजपने त्यांचा विश्वास सार्थ ठरवत खोत यांना विधान परिषद आणि पाठोपाठ मंत्रीपदही देऊन बूज राखली होती. तसेच आता पवार आणि महाविकास आघाडीने शेट्टी यांना पाठबळ दिले असून विश्वासघाताचे राजकारण होत असल्याचा मुद्दा यातून खोडून काढला आहे. वास्तविक शेट्टींना राज्यसभेमध्ये जाण्याची इच्छा होती. मात्र तो मार्ग बंद झाल्याने आता विधान परिषदेवर समाधान मानावे लागणार आहे. यातून शेट्टी यांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे.  सदाभाऊ खोत, लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वाभिमानीला रामराम ठोकून जय शिवराय किसान संघटना उभी करणारे संस्थापक शिवाजी माने यांनी राजू शेट्टी यांनी हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचे टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या निर्णयामुळे स्वाभिमानीची शेतकरी चळवळ उघडय़ावर पडण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र या वक्तव्यांना शेट्टी यांनी बेताल ठरवले आहे.

तेव्हा आणि आता

शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यात नेहमीच वितुष्ट असायचे. उसाच्या दरावरून त्यांनी घेतलेल्या आक्र मक भूमिके मुळे राष्ट्रवादीशी संबंधित साखर सम्राटांची अधिक पंचाईत झाली होती. यातूनच शरद पवार यांनी राजू शेट्टी यांना लक्ष्य केले होते. राजू शेट्टी हे विशिष्ट समाजाच्या नेत्यांशी संबंधित साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन करीत नाहीत, असे उघडपणे पवार बोलले होते. यातून पवारांवर टीकाही झाली होती. तेच शेट्टी आता राष्ट्रवादीच्या जवळ गेले आहेत, तर पवारांनीही शेट्टी यांना जवळ करून पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्टय़ातील एक प्रभावी नेतृत्व संपविल्याची चर्चा सुरू झाली.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत जाण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे. पण माझ्या दृष्टीने सत्तेचे पद, लोकप्रतिनिधी यापेक्षा शेतकरी चळवळ अधिक महत्त्वाची आहे. शेतकरी व शेतकरी चळवळीला कोठे आडकाठी होत असल्याचे दिसल्यास चळवळीशी बांधिलकी ठेवून पदाचा त्याग करण्याचीही तयारी आहे.

– राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना