कोल्हापूर : एक पैशाचाही घोटाळा केला नाही असे म्हणून संजय राऊत यांना बाजूला होता येणार नाही. घोटाळा केला नसेल तर त्यांनी न्यायालयातून ते सिद्ध केले पाहिजे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तांवर आज ईडीने कारवाई केली. त्यावर त्यांनी ईडीला टीकेचे लक्ष्य केले आहे. याविषयी विचारले असता पाटील यांनी संजय राऊत यांच्या एक पैशाचाही घोटाळा केला नाही, या विधानावर सामान्य जनतासुद्धा विश्वास ठेवणार नाही.

राऊत वापरत असलेल्या शब्दांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे काम आपण एकाकडे सोपवले आहे. राऊत वापरत असलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी आहे का, असा प्रश्न आपण सामान्य जनतेला विचारणार आहोत. मुळात संजय राऊत यांचे अशाप्रकारचे बोलणे हे काही नवीन नाही. यापूर्वीही त्यांनी अशी विधाने केली आहेत. त्यांच्यावर जे संस्कार आहेत त्याप्रमाणे ते बोलत राहतात, असा टोला त्यांनी लगावला.

पत्राचाळ गैरव्यवहारातील राऊत यांच्या सहभागाची चौकशी करावी- सोमय्या 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगाव येथील पत्रा चाळ गैरव्यवहारातील राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार  किरीट सोमय्या यांनी मंगळवारी केली. राऊत यांच्या अलिबागमधील जमिनी व दादरमधील आलिशान घर ईडीने जप्त केले आहे. यासंदर्भात सोमय्या म्हणाले की, खासदार राऊत यांनी १० वर्षांपूर्वी ५५ लाख रुपये कर्जरूपाने घेतल्याचे आणि ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यावर ते परत केल्याचे आठ महिन्यांपूर्वी दाखविले होते. ही गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली होती.