शहापूर (ता. हातकणंगले) येथील गवंडी कामगार दीपक मारुती मस्तूद याच्या खूनप्रकरणी शहापूर पोलिसांनी मंगळवारी तिघा जणांना अटक केली. माणिक ऊर्फ योगेश बळीराम कांबळे, विनोद शिवाजी जाधव आणि अनिल वसंत वाघमारे (सर्व रा. तारदाळ) अशी त्यांची नावे आहेत. मस्तूद याचा खून अनतिक संबंधातून केल्याची कबुली तिघांनीही दिली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विठ्ठलनगर येथे राहणाऱ्या दीपक मस्तूद याचा ३१ ऑगस्ट रोजी याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. शहापूर पोलिसांच्या विविध पथकांद्वारे या हल्लेखोरांचा तपास सुरू होता. इचलकरंजीतील मरगूबाई मंदिर परिसरात या खुनातील संशयित माणिक कांबळे, विनोद जाधव व अनिल वाघमारे या तिघांना गावभाग पोलिसांच्या मदतीने सापळा रचून रात्री ताब्यात घेण्यात आले. माणिक याच्या आईशी दीपक याचे अनतिक संबंध होते. याचा माणिक याला राग होता. त्यातच रविवारी रात्री दीपक व माणिक यांच्यात वादावादी झाली होती. याच रागातून माणिक याने दीपक याचा काटा काढण्याचे ठरवले. माणिक व त्याचे दोन मित्र विनोद जाधव व अनिल अशा तिघांनी मिळून सोमवारी दुपारी एटीएममधून सात हजार रुपये काढले. त्यानंतर त्यांनी मद्य प्राशन केले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विनोद याने दीपक याला काम आहे असे सांगून घरातून बोलावून आणले. विठ्ठलनगरातील वीटभट्टीनजीकच्या मदानात दीपक याला माणिकने लोखंडी पाइपने बेदम मारहाण केली. डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्यातच दीपकचा मृत्यू झाला. यानंतर तिघांनीही कोल्हापूर गाठले. त्यानंतर कराड, पुणे येथून सोलापूर येथे गेले. सोलापूर येथे एका लमाण वसाहतीत त्यांनी आसरा घेतला होता. या दरम्यान, तेथील नागरिकांनी या तिघांना चोर समजून मारहाणही केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर या तिघांनी कर्नाटक गाठले होते. सोमवारी रात्री ते इचलकरंजीत येत असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.