२०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वानखेडे मैदानावर झालेल्या, विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात धोनीने षटकार ठोकत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. तब्बल २७ वर्षांनी भारतीय संघाने विश्वचषकाचं विजेतेपद पटकावल्यामुळे सर्वांसाठी हा विजय खास मानला जातो. मात्र वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेला हा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला आहे. ते श्रीलंकेतील News 1st वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी यामध्ये कोणाचाही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.” अलुथगमगे यांनी आपली बाजू मांडली.

अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी २७५ धावांची गरज होती. महेला जयवर्धनेचं शतक आणि तिलकरत्ने दिलशान व कुमार संगकारा यांच्या फटकेबाजीमुळे लंकेच्या संघाने हा मोठा पल्ला गाठला. धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली होती. विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर हे महत्वाचे खेळाडू लवकर बाद झाले. मात्र यानंतर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनीने संघाजी बाजू सांभाळली. धोनीने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा षटकार खेचत पूर्ण केल्या आणि भारताने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी केलेल्या या दाव्यावर बीसीसीआय किंवा आयसीसीने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.