मैदानावर झोकून देण्याच्या क्षमतेमुळेच अफगाणिस्तान संघाने दुबळा संघ हा शिक्का पुसून ‘आयसीसी’चा कसोटी दर्जा मिळविणारा संघ असा प्रवास केला आहे. भल्याभल्या संघांना धक्का देण्याची क्षमता असलेल्या अफगाणिस्तानने अनेक मातब्बर संघांना पराभूत केले आहे. २०१५मध्ये पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक खेळणाऱ्या अफगाणिस्तानने स्कॉटलंडवर विजय मिळवला असला तरी गेल्या काही वर्षांत त्यांनी क्रिकेटमध्ये थक्क करणारी प्रगती केली आहे. २०१८च्या आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानने साखळी फेरीत श्रीलंका आणि बांगलादेशला पराभवाचा धक्का देत भारत आणि पाकिस्तानला साखळी फेरीत विजयासाठी अखेपर्यंत झुंजवले होते. यंदाच्या विश्वचषकात अन्य संघांच्या तुलनेत अफगाणिस्तानचा संघ कमकुवत वाटत असला तरी बडय़ा संघांना पराभूत करण्याची क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे. रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान यांनी जगभरातील ट्वेन्टी-२० स्पर्धा गाजवल्या असून आता त्यांच्यावरच अफगाणिस्तानची खरी भिस्त असणार आहे. गुलाबदीन नैब अफगाणिस्तानच्या युवा संघाचे नेतृत्व सांभाळत असून माजी कर्णधार असगर अफगाणचा अनुभव त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

अपेक्षित कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव पाहता, अफगाणिस्तानचा संघ बाद फेरीत मजल मारेल, असे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही. मात्र किमान दोन ते तीन संघांना पराभूत करण्याची क्षमता त्यांच्याकडे नक्कीच आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत होणाऱ्या संघाचे मात्र बाद फेरीतील स्थान धोक्यात येऊ शकते.

बलस्थाने आणि कच्चे दुवे

फिरकी गोलंदाजी हेच अफगाणिस्तानचे बलस्थान आहे. रशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांच्या फिरकीत विविधता असून ‘पॉवर-प्ले’मध्ये धावांचा रतीब रोखण्याची तसेच ठरावीक अंतराने बळी मिळवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. फिरकी गोलंदाजी अव्वल असली तरी वेगवान गोलंदाजी फारच कमकुवत आहे. त्यातच अफगाणिस्तानची गोलंदाजी इंग्लंडमधील खेळपट्टय़ांवर कितपत यशस्वी ठरते, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहील. अफगाणिस्तानला फलंदाजीची चिंता नक्कीच सतावेल. मोहम्मद शहझाद, रहमत शाह,

नजीबुल्ला झादरान यांच्यावर अफगाणिस्तानच्या फलंदाजीची भिस्त राहील. विश्वचषकाआधीच गुलाबदीन नैब याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या नैबला अद्याप फलंदाजीतही आपली गुणवत्ता सिद्ध करता आलेली नाही. माजी कर्णधार असगर अफगाणला कर्णधारपदासाठी डावलले असले तरी त्याचा फटका अफगाणिस्तानला बसू शकतो.

संकलन : तुषार वैती