भारतीय संघाचा मध्यमगती गोलंदाज अजित आगरकरने बुधवारी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतून निवृत्तीची घोषणा केली. १९९८ ते २००७ दरम्यान भारतीय संघातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना आगरकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद ५० बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. गेल्या वर्षी आगरकरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने रणजी करंडकावर नाव कोरले होते.
आगरकरने २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ४ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ११० प्रथम श्रेणी सामनेही तो खेळला. २००३मध्ये अॅडलेड येथील कसोटीत दुसऱ्या डावात सहा बळी मिळवत आगरकरने भारताला २३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी विजय मिळवून दिला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो १९९९-२००० दरम्यान सलग पाच वेळा शून्यावर बाद झाला होता. फलंदाजीतही योगदान देत त्याने इंग्लंडविरुद्ध २०००मध्ये लॉर्ड्सवर शतक झळकावले होते.
१६ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने मुंबईला आठ रणजी जेतेपदे जिंकून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती. गेल्या वर्षी एका वादग्रस्त घटनेनंतर आगरकरकडे मुंबई संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. नोव्हेंबर २०११मध्ये ओरिसाविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या अंतिम संघात निवड न झाल्यामुळे नाराज होऊन तो कटकहून मुंबईत परतला होता. २०११-१२च्या रणजी मोसमातून त्याने माघार घेतली होती. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनशी जुळवून घेतल्यानंतर तो फेब्रुवारी २०१२मध्ये मुंबई संघात परतला होता.
फलंदाजीतील कारकीर्द
        सामने    धावा    सर्वोत्तम    १००/५०
कसोटी        २६    ५७१    १०९*    १/०
एकदिवसीय    १९१    १२६९    ९५    ०/३
ट्वेन्टी-२०     ४    १५    १४    ०/०
गोलंदाजीतील कारकीर्द
        सामने    बळी    सर्वोत्तम    ५/१०
कसोटी        २६    ५८    ६/४१    १/०
एकदिवसीय    १९१    २८८    ६/४२    २/०
ट्वेन्टी-२०    ४    ३    २/१०    ०/०