ज्वाला गट्टाच्या आजीवन बंदी प्रकरणाचा आपण अभ्यास करत असून तिला क्रीडा मंत्रालयाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी दिले.
पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना जितेंद्र सिंग म्हणाले की, ‘‘ज्वालाला आमच्याकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. क्रीडा मंत्रालय नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आले आहे. ज्वालाच्या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.’’
ते म्हणाले, ‘‘पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये ज्वालाचा भारताच्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. ज्वालाला क्रीडा मंत्रालयाकडून वेळोवेळी योग्य ते सहकार्य मिळत आहे.’’
देशाची मान उंचावणाऱ्या ज्वालासारख्या दर्जेदार खेळाडूला भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडून अयोग्य वागणूक मिळत आहे, असे मोईली यांनी २३ ऑक्टोबर रोजी क्रीडा मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.