भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याने लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत इंग्लंडच्या ल्युक मॅकशेनीविरुद्ध पराभवाची नामुष्की टाळली. हा डाव त्याने १०८ चालींनंतर बरोबरीत सोडविला.
आनंदला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. आनंदला ल्युकविरुद्ध पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळण्याचा फायदा घेता आला नाही. आनंदने एक गुणासह ज्युडिथ पोल्गार हिच्या साथीत संयुक्तपणे पाचवे स्थान घेतले आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू मॅग्नुस कार्लसन याने येथे विजय मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याचे आता २ हजार ८५६ मानांकन गुण झाले असून, सर्वाधिक मानांकन गुण मिळविणारा पहिला खेळाडू होण्याची किमया त्याने केली आहे. त्याने येथे द्वितीय मानांकित खेळाडू लिवॉन आरोनियन याच्यावर मात केली. माजी विश्वविजेता खेळाडू व्लादिमीर क्रामनिक याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याचा पराभव करीत आपले आव्हान राखले. महिलांमधील सर्वोत्तम खेळाडू ज्युडिथ पोल्गार हिला इंग्लंडच्या गेवेन जोन्सने बरोबरीत रोखले. इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सला आज पुढे चाल मिळाली होती.
या स्पर्धेत कार्लसन व क्रामनिक यांनी प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्त आघाडी स्थान मिळविले आहे. नाकामुरा व अ‍ॅडम्स हे तीन गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मॅकशेनीने स्लाव्ह चेबोनेन्को तंत्राचा उपयोग करीत आनंदला झुंजविले. डावाच्या मध्यास आनंदने प्यादाचा बळी देत आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेण्यावर भर दिला. त्या वेळी आनंद हा पराभवाच्या छायेत सापडला होता. मात्र वेळेच्या बंधनात चाली करण्याच्या दडपणाखाली मॅकशेनी याला अतिरिक्त प्याद्याचा फायदा घेता आला नाही. अखेर १०८व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली.