अनिरबन लाहिरीला विश्वास

‘‘भारताच्या ऑलिम्पिक पथकात समावेश झाल्यामुळे मला खूप आनंद झाला असून रिओ येथे पदक मिळवीत गोल्फची लोकप्रियता वाढविण्याचे माझे ध्येय आहे,’’ असे गोल्फपटू अनिरबन लाहिरीने सांगितले.

लाहिरीबरोबरच एस.एस.पी.चौरासिया व आदिती अशोक यांनी ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे. याबाबत लाहिरी म्हणाला, ‘‘आम्ही सर्वच खेळाडू तेथे पदक मिळविण्यासाठीच सहभागी होत आहोत. एकूणच भारतासह आशियाई स्तरावर गोल्फबाबत अपेक्षेइतकी लोकप्रियता दिसून येत नाही. आम्ही जर पदक मिळविले, तर निश्चितपणे या खेळाचा मान वाढणार आहे. जगातील अनेक नामवंत खेळाडूंनी ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे या खेळाच्या लोकप्रियतेवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.’’

ऑलिम्पिकमध्ये ११२ वर्षांनंतर गोल्फचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या तीन खेळाडूंबरोबरच थायलंडचा थोंगचाई जैदी, बांगलादेशचा सिद्दिकूर रहेमान, फिलिपिन्सचा मिग्वेल तेब्युना, मलेशियाचा डॅनी चिआ यांच्यावरही आशियाई खंडाची भिस्त आहे. आशियाई खंडातील १६ खेळाडू रिओ येथे आपले नशीब अजमावण्यासाठी जाणार आहेत.

‘‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२०च्या ऑलिम्पिकनंतरही गोल्फचे स्थान अबाधित ठेवले, तर निश्चितपणे या खेळाची प्रतिमा उंचावणार आहे व अधिकाधिक खेळाडू या खेळात करिअर करण्याकडे वळतील,’’ असेही लाहिरीने सांगितले.

जागतिक क्रमवारीतील जेसन डे, जॉर्डन स्पिथ, अ‍ॅडम स्कॉट, लुईस ओस्थुईझेन, चार्ल श्वार्तझेल, विजयसिंग, ग्रॅहॅम मॅकडोवेल, रोरी मॅकरॉय आदी अव्वल दर्जाच्या खेळाडूंसह अनेक नामवंत खेळाडूंनी ‘झिका’ रोगाच्या प्रादुर्भावाचे कारण देत ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे.