किनारी कबड्डी

भारत हा निसर्गसंपन्न देश आहे. या देशाला सागरकिनाऱ्यांचेही मोठे वैभव लाभले आहे. मात्र त्या तुलनेत क्रीडा आणि पर्यटन या दोन पायांवर उभ्या असलेल्या किनारी क्रीडा स्पर्धा मात्र उपेक्षितच राहिल्या आहेत. कधी किनाऱ्यावरील आयोजनासाठी मान्यतेचा अडथळा कसा पार करावा, ही प्रमुख समस्या जाणवते, तर कधी काही विशिष्ट खेळांसाठी महिला खेळाडूंचा गणवेश हा भारतात अडचणीचा ठरतो. देशात तळागाळात रुजलेल्या कबड्डीचासुद्धा किनारी मार्गावरील प्रवास फारसा सुखद राहिलेला नाही. त्यामुळेच किनारी कबड्डी स्पध्रेत भारताला आपले वर्चस्व अबाधित राखता आलेले नाही.

२००५पासून राष्ट्रीय किनारी कबड्डी स्पध्रेला प्रारंभ झाला. तेव्हापासून ही स्पर्धा अविरत चालू आहे. मात्र नोकरी, बढती, इनाम या ठिकाणी या स्पध्रेचा गांभीर्याने विचार होत नाही. त्यामुळे खेळाडू आणि संघटकांमध्ये किनारी स्पध्रेविषयी अनास्था आहे. किनारी कबड्डीला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्यास प्रो कबड्डी लीगलाही मागे टाकण्याची क्षमता त्यात आहे, हे अजून कबड्डीधुरिणांना उमगलेले दिसत नाही.

मार्च २००६मध्ये मुंबईच्या दादर समुद्रकिनाऱ्यावर माध्यम संस्थेने किनारी कबड्डी स्पर्धा आयोजन करण्याचे धारिष्टय़ दाखवले होते. खेळ आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे उत्तम प्रतिबिंब त्या स्पध्रेत उमटले होते. त्यानंतर वेंगुल्र्यात मार्च २०१०मध्ये राष्ट्रीय किनारी कबड्डी स्पर्धा झाली. यानंतर बऱ्याच वर्षांनंतर राज्यातील तिसरी स्पर्धा प्रभादेवीच्या ओम ज्ञानदीप मंडळाने आयोजित करण्याचे शिवधनुष्य पेलले. आंतरराष्ट्रीय पंच जितेश शिरवाडकरच्या नेतृत्वाखाली या संस्थेने हे आव्हान यशस्वी करून दाखवले. यानिमित्ताने देशातील सागरकिनारी कबड्डी स्पर्धेच्या वाटचालीचा आढावा घेतल्यास या प्रकाराबाबत उदासीनतेचेच वातावरण आढळते.

ओम ज्ञानदीपच्या यशाची वैशिष्टय़े

  • जुन्या प्रभादेवीच्या समुद्रकिनाऱ्यावर कबड्डी स्पध्रेच्या आयोजनासाठी ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाने गेले दीड-दोन महिने तयारी केली. या कालावधीत त्यांनी विविध अडचणींवर मात केली.
  • किनाऱ्यावरील कबड्डी स्पध्रेसाठी संघटनेव्यतिरिक्त विविध प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी संस्थेला अनेक ठिकाणी झगडावे लागले. यापैकी बऱ्याच ठिकाणी अनभिज्ञता दिसून आली.
  • सागरकिनारी कबड्डी स्पध्रेसाठी मैदान बनवणे ही प्रमुख अडचण होती. कारण येथील किनारा हा तसा अपुरा होता. वाळू साफ करताना काचा आणि अन्य घाण साफ करावी लागली. या वेळी एक गोण भरेल इतक्या मद्याच्या बाटल्या सापडल्या.
  • वाळू समांतर पातळीवर आणण्यासाठी पाच-सहा दिवस लागले. कारण येथील किनारा खचला असल्यामुळे हे आव्हान पेलणे अवघड होते.
  • मैदानावरील रेषा तयार करताना जर्सीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या कापडाचा वापर करण्यात आला. शिगा रेतीमध्ये खोलवर रुजवून त्यांच्या साहाय्याने हे मैदान आखण्यात आले.
  • उद्योगपती नेस वाडिया यांचा बंगला मागे असल्यामुळे त्या बाजूच्या भिंतीवर कोणतेही फलक वगैरे लावण्यास मनाई होती. याशिवाय ध्वनिमर्यादेची अटसुद्धा होती.
  • स्पध्रेच्या अंतिम फेरीच्या दिवशी पौर्णिमा येत होती. त्या वेळी भरतीचे प्रमाण जास्त असणार हे गृहीत धरून एक दिवस आधीच स्पर्धा संपवण्यात आली.

भारताच्या वर्चस्वाला कडवी आव्हाने

  • २००८ साली बाली येथे झालेल्या आशियाई किनारी क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीने स्थान मिळवले. तेव्हापासून २०१६पर्यंत दर दोन वर्षांनी होणाऱ्या या क्रीडा स्पर्धामध्ये कबड्डीचा समावेश आहे. आता ही स्पर्धा दर चार वर्षांनी होणार आहे. भारतीय पुरुष संघाला २००८ आणि २०१० अशा सुरुवातीच्या दोन स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवता आले. मात्र त्यानंतर भारताची या प्रकारातील पकड ढिली झाली. त्यामुळे २०१२ आणि २०१४मध्ये इराणने जेतेपदाला गवसणी घातली, तर २०१६मध्ये पाकिस्तानने भारताला हरवून विजेतेपदाचा मान मिळवला. महिलामध्ये मात्र आतापर्यंतच्या पाचही विजेतेपदांवर भारताचे वर्चस्व दिसून आले आहे. याव्यतिरिक्त २०१६मध्ये मॉरिशस येथे एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली होती.

सागरकिनारी व्हॉलीबॉल हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे. ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये या खेळाचे तिकीट मिळत नाही. भारताला पर्यटनाचा विकास करायचा असेल, तर सागरकिनारी क्रीडा स्पर्धाकडे लक्ष केंद्रित करण्याची नितांत आवश्यकता आहे. खेळाच्या व्यतिरिक्त आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंबसुद्धा त्यात अधोरेखित करता येईल. सागरकिनारी कबड्डी स्पध्रेसाठी वाळूचे मैदान कशा प्रकारे असायला हवे, यासाठी आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कबड्डी संघटनेने नियमावली केली आहे. प्रत्येक ठिकाणच्या वाळूत थोडाफार फरक हा असणारच. त्या ठिकाणच्या वातावरणाचा त्यावर प्रभाव असतो. आफ्रिकेतील वाळू आणि भारतातील यात तर बराच फरक आहे. मात्र आपण त्या वाळूबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. मात्र स्थानिक स्पर्धामध्ये त्याचे पालन केले जात नाही.

ई. प्रसाद राव, भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या तांत्रिक समितीचे प्रमुख

कबड्डीला रुजवण्याचे आव्हान आधी होते, नंतर सागरकिनारी. राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धा सातत्याने होतात. मात्र या प्रकाराला अजून म्हणावे तसे स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झालेले नाही. परंतु सागरकिनारी कबड्डीला भवितव्य उज्ज्वल आहे. या प्रकाराचा सराव हा आव्हानात्मक असतो. कारण किनाऱ्यावर जाऊन तो करावा लागतो. पुण्यासारख्या अनेक जिल्ह्यांना किनाराच नाही, त्यामुळे त्यांना मर्यादा आहे. या प्रकाराचे नियम खेळाडूची दमछाक करणारे आहेत. प्रत्येक चढाई ही ‘करो या मरो’ तत्त्वावर आधारित आहे. याचप्रमाणे बचावपटू बाद होत नाही. परंतु मिनिटे मात्र तितकीच आहेत. यावर विचार करण्याची गरज आहे. प्रक्षेपण आणि लोकाभिमुख केल्यास या प्रकारात लोकप्रिय होण्याची खूप क्षमता आहे.

श्रीराम भावसार, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू व प्रशिक्षक

महाराष्ट्राबाबत सांगायचे तर, खेळाडूंचा दैनंदिन असा वाळूवर सराव होत नाही. आपले खेळाडू मातीच्या आणि मॅटच्या मैदानावर खेळतात. किनारा जवळ असलेले काही खेळाडू वाळूवर धावतात. पण सराव करण्याचे ते प्रकर्षांने टाळतात. कारण वाळूत अतिशय दमछाक होत असल्याने चांगली क्षमता लागते. सागरकिनारी कबड्डी प्रकारात विकसित होण्यासाठी नियमित सराव शिबिरे घेण्याची नितांत आवश्यकता आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र सागरकिनारी कबड्डीचा विकास अधिक जोमाने सुरू आहे.

– दिनेश पाटील, महाराष्ट्राचे प्रशिक्षक