आशिया चषक स्पर्धेत रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारने मधल्या फळीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा अंतिम फेरीत ३ गडी राखून पराभव केला आणि आशिया चषकावर सातव्यांदा आपले नाव कोरले. भारताने बांगलादेशला २२२ धावांमध्ये गुंडाळले. मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव मधल्या षटकांमध्ये काहीसा गडबडला होता. पण अखेर केदार जाधवने एकेरी धाव काढून भारताला विजय मिळवून दिला.

या विजयासह केदारने आयपीएलमधील स्वतःच्या एका कामगिरीची पुनरावृत्ती केली. बांगलादेश विरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळताना केदार जाधवला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली होती. पण नंतर ४९ व्या षटकात मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर माघारी परतल्यामुळे केदार जाधवने पुन्हा मैदानात येऊन कुलदीप यादवच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अशीच कामगिरी केदारने आयपीएलच्या २०१८च्या हंगामात केली होती. मुंबईविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईला विजयासाठी १६६ धावांची गरज होती. त्यावेळी केदार जाधव हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे फलंदाजी सोडून मैदानाबाहेर गेला होता. पण गरजेच्या केदारनेच चेन्नईला विजय मिळवून दिला होता. एक षटकार आणि १ चौकार लगावत त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तशीच कामगिरी त्याने अंतिम सामन्यातही केली.

दरम्यान, केदारच्या दुखापतीबाबत लवकरच माहिती देण्यात येईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे.