स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या दोनही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. भारताने पहिला सामना ८ गडी राखून तर दुसरा सामना ९ गडी राखून जिंकला. आता अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ पात्र ठरला, तर पाकला नमवून चॅपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा बदल घेण्याची भारताला चांगली संधी आहे. मात्र याच चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने एक मोठे विधान केले. पाकिस्तानला मिळालेला हा विजय म्हणजे एकप्रकारे तुक्काच होता, असे मत त्याने व्यक्त केले आहे.

पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात मिळवलेला विजय हा केवळ एक तुक्का होता. त्या दिवशी भारतीय संघाची चांगली कामगिरी होऊ शकली नाही, त्यामुळे पाकिस्तानला हा सामना जिंकणे शक्य झाले. पण आता आशिया चषकात पाकिस्तानने दोन सामन्यात जो सपाटून मार खाल्ला आहे, त्यामुळे तरी पाकिस्तान आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठवणींमध्ये रमणे सोडून वर्तमानात येईल, अशी अपेक्षा आहे. कारण ती स्पर्धा जिंकून आता दीड वर्ष होऊन गेले, असेही अक्रम म्हणाला.

मी २० वर्षे पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलो. पण अशा पद्धतीचा एकतर्फी खेळ कधीही झाला नाही. १९९०च्या दशकात भारतीय संघ पाकिस्तानच्या संघाला घाबरत होता. पण आता तीच गत पाकिस्तानची होताना दिसत आहे याचे वाईट वाटते, असेही तो म्हणाला.