आयर्टन सेना डा सिल्व्हाच्या स्मृतींनी सारेच हेलावले
१६१ ग्रां. प्रि. स्पर्धा, ६४ पोल पोझिशन्स, ४२ ग्रां. प्रि. जेतेपदे आणि १९८८- १९९०- १९९१ अशी तीन विश्वविजेतेपदे.. अद्भुत वाटावी अशी ही आकडेवारी. आयर्टन सेना डा सिल्व्हा या किमयागार शर्यतपटूच्या पर्वाची अखेर याच दिवशी झाली. फॉम्र्युला वन ट्रॅकवरचा त्याचा थक्क करणारा वावर, विजिगीषु वृत्ती आणि शर्यतपटूंच्या सुरक्षिततेविषयी त्याला असणारी कणव या गुणवैशिष्टय़ांमुळे सिल्व्हा फॉम्र्युला वन प्रेमींचा लाडका ठरला. मात्र १९९४ साली याच दिवशी इमोला, इटलीतील सॅन मारिनो ग्रां. प्रि. शर्यतीत त्याचा अनपेक्षित मृत्यू ओढवला. सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या एका पर्वाची अखेर फॉम्र्युला वन ट्रॅकवरच झाली आणि सारेच हळहळले. या दुर्दैवी निधनाने आधुनिक काळातील सर्वोत्तम शर्यतपटूला गमावल्याची भावना सगळ्यांनीच व्यक्त केली होती. सेनाच्या निधनानंतर फॉम्र्युला वनचा पसारा आणखी विस्तारला. शर्यतीची परिमाणे बदलली, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला. मायकेल शूमाकर हा या नव्या विश्वाचा स्टार झाला. शूमाकरचा प्रभाव ओसरतानाच जर्मनीच्या सेबॅस्टिअन वेटेलने आपली हुकूमत सिद्ध केली. नवनवीन शर्यतपटू फॉम्र्युला वन विश्वाच्या क्षितिजावर चमकत असले तरी २० वर्षांनंतरही सेनाच्या नावाचा दबदबा कमी झालेला नाही.
२० वर्षांपूर्वी फॉम्र्युला वन शर्यतीसाठी सेनाची तयारी सुरू होती. मुख्य शर्यतीपूर्वी होणाऱ्या सराव शर्यतीच्या वेळी ऑस्ट्रियाचा रोलँड रॅट्झझेनबर्गरचा आकस्मिक मृत्यू झाला. मात्र या घटनेचा सेनाने आपल्या तयारीवर जराही परिणाम होऊ दिला नाही. शर्यतीच्या दिवशी सकाळीच त्याचे मॅकलरेन संघाचा सहकारी अलेन प्रोस्टशी बोलणे झाले. शर्यतपटूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे यासाठी ग्रां. प्रि. शर्यतपटूंची संघटनेची पुनस्र्थापना करण्याविषयी त्यांच्यात बोलणे झाले. योगायोग म्हणजे या विषयाची निकड किती आहे हे अवघ्या काही तासांतच स्पष्ट  झाले. शर्यतीदरम्यान सेनाच्या गाडीला अपघात झाला. वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला गाडीतून बाहेर काढत उपचार करण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्याची स्थिती गंभीर असल्याने त्याला हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
१ मे- महाराष्ट्र दिन, कामगार दिन यामुळे या दिवसाशी आपला ऋणानुबंध खूप घट्ट आणि अनोखा. मात्र फॉम्र्युला वन विश्वात हा काळाकुट्ट दिवस म्हणून ओळखला जातो. प्रत्येक शर्यतीगणिक नवनवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या एका वेगवान प्रवासाचा शेवट या दिवशी झाला. केवळ शर्यत, जेतेपद यापेक्षाही शर्यतपटूंची सुरक्षितता, त्यासाठी संघटना यासाठी सेनाने पुढाकार घेतला होता. त्याने रोवलेल्या या बीजांमुळेच आज फॉम्र्युला वन विश्वाला सुरक्षिततेचे कवच लाभले आहे.