सिंगापूर ओपन सुपरसिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत बी. साई प्रणीत आणि किदम्बी श्रीकांतने इतिहास रचला आहे. साई प्रणीत आणि किदम्बी श्रीकांतने शनिवारी सरळ गेम्समध्ये प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत सिंगापूर ओपन सुपरसिरीजच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने इंडोनेशियाच्या अँथॉनी सिनिसुका गिटिंगवर २१-१३, २१-१४ असा सफाईदार विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पटकावले. श्रीकांतसोबतच साई प्रणीतनेदेखील अंतिम फेरीत प्रवेश केल्याने आता दोन भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये सिंगापूर ओपन सुपरसिरीज स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा एकाच देशाचे दोन खेळाडू अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. याआधी चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्कच्या खेळाडूंनी ही किमया साधली आहे.

श्रीकांतआधी बी. साई प्रणीतने अंतिम फेरीत डोंग कुन लीचा २१-६, २१-८ असा अवघ्या १७ मिनिटांमध्ये धुव्वा उडवला. जानेवारी महिन्यात प्रणीतने सय्यज मोदी ग्रँड प्रिक्सच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र त्यानंतर त्याला खांद्याच्या दुखापतीने सतावले होते. मात्र सिंगापूर ओपनमध्ये प्रणीतची विजयी घौडदौड सुरु आहे. कोरिया मास्टर्स ग्रँड प्रिक्समध्ये तीनवेळा सुवर्णपदकाची कामगिरी करणाऱ्या लीचा पराभव करत प्रणीतने सर्वांनाच धक्का दिला आहे.

प्रणीतने अंतिम फेरीत प्रवेश केल्यावर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या श्रीकांतने हळूहळू सामन्यावर वर्चस्व मिळवले. इंडोनेशियन प्रतिस्पर्धी ९-६ ने आघाडीवर असूनही श्रीकांतने चोख प्रत्युत्तर दिले आणि ब्रेकपर्यंत ११-१० अशी माफक आघाडी घेतली. यानंतर श्रीकांतने आघाडी १६-१० अशी वाढवली. यानंतर गुणांचा धडाका लावत श्रीकांतने पहिला गेम २१-१३ असा खिशात घातला.

दुसऱ्या गेममध्येही श्रीकांतचा झंझावात कायम होता. इंडोनेशिय प्रतिस्पर्ध्याला कायम दबावाखाली खेळण्यास भाग पाडत श्रीकांतने अर्धी लढाई जिंकली. यामुळे प्रतिस्पर्ध्याकडून अनेक चुका झाल्या आणि त्या फायदा घेत श्रीकांतने ९-१ अशी भक्कम आघाडी घेतली. श्रीकांतने घेतलेली मोठी आघाडी काढण्याचा प्रयत्न करताना प्रतिस्पर्धी खेळाडूने काही उत्तम फटके लगावले. त्यामुळे श्रीकांतची आघाडी १६-१४ अशी कमी झाली होती. मात्र तरीही श्रीकांतने न डगमगता खेळ केला आणि सलग पाच गुणांची कमाई करत गेमसह सामनादेखील खिशात घातला.