मुंबई मास्टर्स संघावर २१-१९ असा विजय
भारतीय टेनिस आणि टेनिसपटूंना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या चॅम्पियन्स टेनिस लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या सलामीच्या लढतीत पंजाब मार्शल्स संघाने यजमान मुंबई मास्टर्स संघावर २१-१९ असा निसटता विजय मिळवला. तिन्ही लढतींत विजय साकारणारा मार्कोस बघदातीस पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
लिजंड्स एकेरीत मुंबई मास्टरच्या रिचर्ड क्रायजॅकने पंजाब मार्शलच्या ग्रेग रुडेस्कीवर ५-४ असा विजय मिळवला. सव्‍‌र्ह आणि व्हॉलीज या पारंपरिक तंत्रासह खेळणाऱ्या क्रायजॅकने संघाला विजय मिळवून दिला. यंदाच्या हंगामात अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या फ्लॅव्हिआ पेनेट्टाने मुंबईचे प्रतिनिधित्व करताना पंजाबच्या एलिना स्वितोलिनाला ५-२ असे नमवले. मिश्र दुहेरीच्या लढतीत मार्कोस बघदातीस आणि एलिना स्वितोलिना जोडीने बाजी मारली.
पुरुष दुहेरीत पंजाब मार्शल्सच्या साकेत मायनेनी आणि मार्कोस बघदातीस जोडीने मुंबई मास्टर्सच्या सँटियागो गिराल्डो आणि श्रीराम बालाजी जोडीला ५-३ असे नमवत तिसऱ्या सामन्याअखेर संघाला १६-१५ अशी निसटती आघाडी घेतली.
पहिल्या दोन लढती जिंकत मुंबईने आश्वासक सुरुवात केली, मात्र त्यानंतर झुंजार खेळ करीत पंजाबने २-२ अशी बरोबरी केली. पाचव्या आणि अंतिम लढतीत बघदातीसने सँटियागो गिराल्डोचा ५-४ असा पराभव केला.