01 December 2020

News Flash

खेळाडूंच्या जिवाशी खेळ!

वर्षांतून दोन लीग खेळवण्याच्या निर्णयावर नाराज

बंगळुरू बुल्सचे मालक उदय सिन्हा वालांचा आरोप; वर्षांतून दोन लीग खेळवण्याच्या निर्णयावर नाराज

एका वर्षांत प्रो कबड्डी लीगच्या दोन लीग खेळाडूंना थकावणाऱ्या आहेत. यामुळे दुखापतीचे प्रमाणही वाढले असून त्याचा सर्वाधिक फटका आमच्या संघाला बसला. हा तर खेळाडूंच्या जिवाशी खेळ चाललाय, असे ठाम मत बंगळुरू बुल्सचे मालक उदय सिन्हा वाला यांनी व्यक्त केले. बंगळुरू बुल्सला घरच्या मैदानावर सलग चार पराभवांचा सामना करावा लागला. त्यानंतर वाला यांनी थेट प्रो कबड्डीच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बंगळुरू येथील कांतिरावा स्टेडियमवर शुक्रवारी दबंग दिल्लीने बुल्सला चारी मुंडय़ा चीत केले. त्यानंतर संतापलेले वाला म्हणाले की, ‘‘वर्षांतून दोन लीग खेळवणे, हे खेळाडूंसाठी घातक आहे. त्यांच्या तंदुरुस्तीचा विचार करायला हवा. प्रवास-सामने सतत सुरू असल्याने त्यांना विश्रांती करायला वेळही मिळत नाही. त्यामुळेच दुखापती वाढतात. अशाने आपण त्यांची कारकीर्दही धोक्यात आणत आहोत.’’

मोहित चिल्लर, रोहित बालीयन, सुरिंदर नाडा, जिवा गोपाल व रोहित कुमार हे बंगळुरूचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. खेळाडूंवरही प्रचंड ताण वाढत असल्याचे वाला यांनी सांगितले. बंगळुरूच्या अपयशानंतर ते हताश दिसत होते. मात्र पुढील सत्रात चांगली कामगिरी करू, असे आश्वासन देत त्यांनी खेळाडूंची व प्रशिक्षक रणधीर सिंग यांची पाठराखण केली.

प्रत्येक वर्षी संघात कराव्या लागणाऱ्या बदलावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘संघबांधणीसाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी द्यायला हवा, परंतु येथे प्रत्येक वर्षी संघात बदल करावे लागतात. अशाने संघात योग्य ताळमेळ राहत नाही. पुढील हंगामात बंगळुरूचा हाच संघ असेल, याची खात्री मी देऊ शकत नाही. एक महिनाही सरावासाठी उपलब्ध होत नाही. खेळाडूंची किती पिळवणूक करणार आहोत,’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 3:20 am

Web Title: bengaluru bulls owner uday sinha not happy about pro kabaddi league
Next Stories
1 दोन ध्रुव – ख्रिस्तियानो रोनाल्डो ; लिओनेल मेस्सी
2 पेस-बोपण्णाच्या विजयाने भारताची जागतिक भरारी
3 हॉकी निवड समितीवर रितू राणीची कडाडून टीका
Just Now!
X