जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप

जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे डिसेंबरमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या कोनेरू हम्पीने केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. याबरोबरच दोन महिन्यांत दुसरे विजेतेपद हम्पीला तिच्या नावे करता आले. हम्पीला त्यामुळे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवता आला. कारण तिच्या खात्यात पाच गुणांची भर पडली.

स्पर्धेत अखेरच्या म्हणजेच नवव्या फेरीत हम्पीने भारताच्या द्रोणावल्ली हरिकाविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. परिणामी, सहा गुणांसह हम्पीने केर्न्‍स चषकावर नाव कोरले.

ही स्पर्धा जिंकण्यासाठी हम्पीला अखेरच्या डावात बरोबरी म्हणजेच अर्धा गुण पुरेसा होता. त्याप्रमाणे हरिकाविरुद्ध खेळताना ३२ वर्षीय हम्पीने बरोबरी स्वीकारण्यावर भर दिला. याच स्पर्धेत विजेतेपदाची आणखी एक दावेदार विश्वविजेती वेंजून जू हिला ५.५. गुणांसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. वेंजून जू हिने रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियूकविरुद्ध विजय मिळवला. कोस्टेनियूकला स्पर्धेत चौथे स्थान मिळाले. भारताच्या हरिकाला ४.५ गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

हम्पी सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) महिलांच्या ग्रांप्री मालिकेत अव्वल स्थानी आहे. या वर्षांअखेरीस होणाऱ्या कॅँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीनेही हम्पीची तयारी सुरू आहे. केर्न्‍स चषकात हम्पीला पहिल्याच फेरीत १६ वर्षीय अमेरिकेचा कॅरिसा यिपचा पराभव करता आला होता. मात्र दुसऱ्याच फेरीत हम्पीला मारिया मुझिचूककडून पराभवाचा धक्का बसला. विश्वविजेती वेंजून जू हिलाही हम्पीने बरोबरीत रोखले होते.

आनंदकडून हम्पीचे अभिनंदन

‘‘कोनेरू हम्पीचे अभिनंदन. हम्पी तिच्या बुद्धिबळ खेळाचा पुरेपूर आनंद लुटत आहे आणि एकापाठोपाठ एक यश मिळवत आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी हम्पीने केली आहे,’’ अशा शब्दांत पाच वेळा विश्वविजेत्या भारताच्या विश्वनाथन आनंदने हम्पीचे कौतुक केले.

 

एक चांगली स्पर्धा मला जिंकता आल्याचा आनंद आहे. दोन महिन्यांपूर्वी मी जलद प्रकारात जागतिक स्पर्धा जिंकली होती. परिणामी, दोन स्पर्धा दोन महिन्यांमध्ये जिंकता आल्याचे समाधान वेगळेच आहे. या स्पर्धेत सातव्या फेरीत अलेक्झांड्रा कोस्टेनियूकविरुद्धचा डाव माझ्यासाठी सर्वात कठीण होता. कारण तो डाव बराच वेळ चालला. मात्र तरीदेखील सलग पाचव्या लढतीत कोस्टेनियूकला मला नमवता आले. आता पुढचे मोठे लक्ष्य इटली येथे मे महिन्यात होणारी ग्रांप्री बुद्धिबळ स्पर्धा आहे. त्यानंतर भारतातील काही स्पर्धामध्ये मी सहभागी होणार आहे      – कोनेरू हम्पी

विदितचा तिसरा विजय; आघाडी कायम

प्राग : भारताचा ग्रॅँडमास्टर विदित गुजराथीने प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद करताना  पाचव्या फेरीत अव्वल युवा खेळाडू इराणचा अलिरेझा फिरूझाला नमवले. अवघ्या २४ चालींमध्येच विदितने विजय नोंदवला. ‘‘स्पर्धेतील कामगिरीवर मी खूश आहे,’’ असे पाच सामन्यांतून चार गुणांची कमाई करणाऱ्या विदितने म्हटले. विदितने या दमदार खेळाच्या जोरावर जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल २०मध्ये स्थान मिळवले आहे. विश्वनाथन आनंद (१६वे), सर्जी कार्याकिन (१७वे), हिकरू नाकामुरा (१८वे) यांच्याखालोखाल विदितला १९वे स्थान मिळाले आहे.  व्हॅसेलिन टोपालोव २०व्या स्थानी आहे.