माद्रिदसमोर एसपीजीचे आव्हान ; चॅम्पियन्स लीग उपउपांत्यपूर्व फेरीची वर्गवारी जाहीर

यूएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये (अंतिम १६ संघ) गतविजेता रियल माद्रिदसमोर जेतेपद राखण्यासाठी फ्रान्समधील अव्वल क्लब पॅरिस सेंट जर्मेनचे (पीएसजी) आव्हान आहे. अन्य लढतीत पाच वेळचा विजेता बार्सिलोना आणि इंग्लिश प्रीमिअर लीग विजेता चेल्सी आमनेसामने आहेत.

उपउपांत्यपूर्व फेरीची वर्गवारी यूएफाचे मुख्यालय लीऑन (स्वित्र्झलड) येथे सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यात मँचेस्टर युनायटेडची गाठ सेव्हियाशी पडेल. मँचेस्टर सिटी क्लब हा स्वित्र्झलडच्या बसेल तसेच गत उपविजेता ज्युवेंट्स क्लब टॉटनहॅम होत्सपूरशी दोन हात करेल. पोटरे विरुद्ध लिव्हरपूल, बायर्न म्युनिच वि. बेसिक्टास आणि शाख्तर डॉनेट्स्क वि. रोमा अशा अन्य लढती होतील.

गटवार साखळीतील विजेते मँचेस्टर युनायटेड आणि पीएसजी यांना पहिला टप्पा (लेग) प्रतिस्पर्धी क्लबच्या मैदानावर (अवे) खेळावा लागेल. उपउपांत्यपूर्व फेरीचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि दुसरा टप्पा मार्चमध्ये होईल. पहिला टप्पा १३, १४, २० आणि २१ फेब्रुवारी तसेच दुसरा टप्पा ६, ७, १३ आणि १४ मार्च २०१८ रोजी होईल.

टॉटनहॅम क्लब १३ फेब्रुवारीला ज्युवेंट्सशी टय़ुरिनमध्ये झुंजेल. त्याच दिवशी बसेल घरच्या मैदानावर युरोपा लीग विजेता मँचेस्टर सिटीशी दोन हात करेल. १४ फेब्रुवारीला पोटरे मायदेशात लिव्हरपूरशी खेळेल. त्याच दिवशी रीयल माद्रिद घरच्या मैदानावर बनॅब्युमध्ये पीएसजीशी दोन हात करेल. उपउपांत्यपूर्व फेरीतील उर्वरित लढतीमध्ये २० फेब्रुवारीला चेल्सी क्लबची गाठ स्टॅमफर्ट ब्रिज मैदानावर बार्सिलोनाशी पडेल. म्युनिचमध्ये यजमान बायर्न बेसिक्टासशी झुंजेल. मँचेस्टर युनायटेड पहिल्या टप्प्यातील लढतीसाठी स्पेनला जाईल. सेव्हियाविरुद्धची त्यांची लढत २१ फेब्रुवारीला आहे. याच दिवशी होणाऱ्या दुसऱ्या लढतीमध्ये रोमा क्लब तुर्कीचा अव्वल क्लब शाख्तरशी युक्रेनमध्ये झुंजणार आहे.