भारताच्या एकदिवसीय संघातील निवड सार्थ ठरविताना चेतेश्वर पुजारा याने २७५ चेंडूंमध्ये नाबाद २६१ धावा केल्या, त्यामुळेच कर्नाटकविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात सौराष्ट्रास दुसऱ्या डावात ३ बाद ४६३ असा धावांचा डोंगर रचता आला.
सौराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या ४६९ धावांना उत्तर देताना कर्नाटकने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील ७३ धावांची आघाडी घेणाऱ्या सौराष्ट्राने ९० षटकांच्या खेळात आक्रमक फलंदाजी केली. सागर जगियानी (७०) व शेल्डॉन जॅक्सन (७०) यांचीही उत्तम साथ पुजारा याला मिळाली. सौराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.
पंजाबची झारखंडवर आघाडी
 जमशेदपूर : जीवनज्योत सिंग व तरुवर कोहली यांनी केलेल्या दमदार शतकांमुळेच पंजाबने झारखंडविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ३४ धावांची आघाडी घेत उपान्त्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली. झारखंडने पहिल्या डावात केलेल्या ४०१ धावांना उत्तर देताना पंजाबने दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद ४३५ धावा केल्या. जीवनज्योत याने १९ चौकारांसह १३१ धावा केल्या. त्याने कोहलीच्या साथीत १५६ धावांची भागीदारी केली. कोहली याने १६ चौकार व एक षटकारासह नाबाद १५१ धावा टोलविल्या. त्याने मनदीपसिंग याच्या साथीत २०४ धावांची भागीदारी केली. मनदीपने १२ चौकारांसह ९६ धावा केल्या.