रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या सत्रात अपयशी ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने झारखंडविरुद्धच्या सामन्यात दमदार द्विशतकासह नवा विक्रम प्रस्थापित केला. प्रथम श्रेणीत सर्वाधिक १२ द्विशतके करण्याचा पराक्रम त्याने आपल्या नावे केलाय. यापूर्वी प्रथम श्रेणीत सर्वाधिक द्विशतके विजय मर्चंट यांच्या नावे होती. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीत ११ द्विशतके झळकावली होती. पुजाराने प्रथम श्रेणीतील १२ वे द्विशतक झळकावत तब्बल ७० वर्षे अबाधित असणारा विक्रम मोडीत काढला.

सौराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या पुजाराने झारखंडविरुद्धच्या सामन्यात ३५५ चेंडूत २०४ धावांची खेळी केली. यात त्याने २८ चौकार मारले. श्रीलंका भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी पुजारा पुन्हा फॉर्ममध्ये आल्यामुळे भारतीय संघासाठी ही जमेची बाजू ठरेल. गेल्या काही दिवसांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुजारा अपयशी ठरला होता. पुजाराशिवाय या सामन्यात चिराग जानीने उत्तम खेळी केली. त्याने सौराष्ट्र संघाला १०८ धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे पुजारा आणि चिराग या जोडीने सहाव्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली.

या दोघांच्या दमदार खेळाच्या जोरावर सौराष्ट्र संघाने पहिल्या डावात ९ बाद ५५३ धावांवर डाव घोषित केला. सौराष्टने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसाअखेर झारखंडने २ बाद ५२ धावा केल्या होत्या. झारखंडच्या पहिल्या दोन्ही फलंदाजांना जयदेव उनाडकटने माघारी धाडले.