भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतला अष्टपैलू खेळाडू केदार जाधवच्या आयुष्यात महेंद्रसिंह धोनी आणि सलमान खान या दोन व्यक्तींना विशेष स्थान आहे. मात्र या दोन्ही व्यक्तींमध्ये सर्वात आवडतं कोण या प्रश्नाचं उत्तर देणं आपल्यासाठी खरंच कठीण असल्याचं केदारने सांगितलंय. धोनी की सलमान निवड करणं म्हणजे आई की बाबा या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं असल्याचं मत केदार जाधवने व्यक्त केलंय. तो चेन्नई सुपरकिंग्जच्या Instagram Live Chat मध्ये बोलत होता.

“सुरुवातीच्या दिवसांमध्ये सचिन तेंडुलकर हा माझा आदर्श होता. त्याच्यासारखा खेळ करणं मला जमलं नाही याची मला नेहमी खंत राहिल. पण जेव्हा सगळ्यात आवडत्या खेळाडूची निवड करायची असेल तर मी धोनीचीच निवड करेन. ज्यावेळी मी धोनीला पहिल्यांदा भेटलो त्यावेळी तो भारतीय संघाचा कर्णधार होता. मला वाटलं होतं की तो खूप शिस्तप्रिय असेल…मला आत्मविश्वास देण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. ज्यावेळी तुमचा कर्णधार तुमच्यावर विश्वास टाकतो त्यावेळी तुमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असते.” केदारने धोनीबद्दल आपलं प्रांजळ मत मांडलं.

या गप्पांदरम्यान केदारला सलमान की धोनी या दोघांपैकी एकाची निवड करायला सांगितली. यावर उत्तर देताना केदार म्हणाला, “धोनीमुळे मला भारतीय संघात संधी मिळाली, आणि धोनीमुळेच मला सलमान खानला भेटायची संधी मिळाली. त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड मी करु शकणार नाही. सलमान की धोनी हा प्रश्न विचारणं म्हणजे आई की बाबा या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं आहे.” २०१४ साली आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या केदार जाधवच्या नावावर १३८९ धावा जमा असून यात दोन शतकं आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.