लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या एकाच ध्रुवावरील दोन ताऱ्यांमध्ये होणारी चर्चा ही नेहमी चाहत्यांचा आवडीचा विषय. मग त्यांचाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होतोच. कुणी रोनाल्डोची बाजू मांडतो तर कुणी मेस्सीची. कारकीर्दीत धाकटा भाऊ असणाऱ्या रोनाल्डोला गेल्या अनेक वर्षांत मेस्सीकडून कडवे आव्हान मिळाले आहे. त्यामुळे जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या शर्यतीत या दोन नावांचीच चर्चा होते. तशी ती या वेळीही झाली, परंतु एकजुटीच्या मूळ अस्त्राचा वापर करून बार्सिलोनाला मागील हंगामात पाच जेतेपदे पटकावून देणारा मेस्सी या वेळी वरचढ ठरला. त्याची कामगिरी ही ‘शेरास सव्वाशेर’ अशीच होती.

‘‘माझ्यात अजूनही खेळ शिल्लक आहे. सातत्यपूर्ण कामगिरीसाठी लागणारी प्रगल्भता, ऊर्जा माझ्यात आहे. त्यामुळे यापुढेही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. जोपर्यंत ही ऊर्जा आहे, तोपर्यंत मी खेळत राहीन!’’ बलॉन डी’ओर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या सुरुवातीला झालेल्या भाषणात रिअल माद्रिदचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो बोलत होता. मात्र त्याच्या बोलण्यातून जाणवणारा आत्मविश्वास चेहऱ्यावरून गायब होता. जणू त्यालाही हे माहीत होते की, लिओनेल मेस्सीच यंदा बाजी मारणार. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (फिफा) वर्षांतील सवरेत्कृष्ट खेळाडूला ‘बलॉन डी’ओर पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी रोनाल्डोसमोर मेस्सी आणि नेयमार या बार्सिलोनाच्या आघाडीपटूंचे आव्हान होते. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावण्यात रोनाल्डो यशस्वी होतो की मेस्सी पाचव्यांदा हा पराक्रम करतो, हे तर्क लावण्यात येत होते. एरवी रोनाल्डोच्या वावरण्यातील मुक्तपणा सोहळ्यात बनावटी दिसत होता.

गेली अनेक वष्रे रोनाल्डो आणि मेस्सी या दोन मातब्बर खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कोण, ही चर्चा रंगत आली आहे आणि यापुढेही अनेक वष्रे ती रंगणार आहे. पण हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मेस्सी संयमी, संघाला सोबत घेऊन जाणारा; तर रोनाल्डो आक्रमक आणि एकटय़ाच्या बळावर सामना फिरवणारा. बलॉन डी’ओर पुरस्काराच्या निमित्ताने ही तुलनात्मक चर्चा पुन्हा रंगली. गोल नोंदवणाऱ्यांच्या यादीमध्ये रोनाल्डो (५७) अव्वल स्थानावर असला तरी मेस्सीने (५२) वैयक्तिक विक्रमासह संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी दिलेले योगदान हे महत्त्वाचे आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बार्सिलोनाने पाच स्पध्रेत जेतेपदे पटकावली आणि म्हणूनच ४१.३३ टक्के लोकांनी मेस्सीला मतदान केले, तर रोनाल्डोला २७.७६  टक्के लोकांची पसंती मिळाली. प्रायोजकांच्या पसंतीत रोनाल्डो वरचढ असला तरी मेस्सी त्याला तोडीस तोड आव्हान देण्यासाठी सक्षम आहे. रोनाल्डोने आपला ‘एकला चलो रे’चा हट्ट सोडला नाही, तर त्याला पुढील काळात स्पध्रेत टिकून राहणे धोक्याचे आहे. आपण कितीही प्रतिभावान असलो तरी संघभावना ही महत्त्वाची आहे आणि फुटबॉल हा सांघिक खेळ आहे, याची जाण रोनाल्डोने ठेवायला हवी.

वरचढ कोण?

अचूकता : गोल करण्याची अचूकता हे मेस्सीचे प्रमुख अस्त्र. मेस्सीच्या तुलनेत २०१५-१६ च्या सत्रात रोनाल्डोने अधिक गोल केले आहेत, तरी त्याने गोल करण्याच्या तितक्याच संधी गमावल्याही आहेत. तसेच स्वत: गोल करण्यापेक्षा इतरांना मदत करण्यातही मेस्सी वरचढ ठरतो.

शिस्त :   आक्रमकतेप्रमाणे शिस्त ही हवीच आणि त्या बाबतीत मेस्सीचा हात कुणीच धरू शकत नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी कितीही टीकाटिप्पणी केली तरी त्याला आपल्या कर्तृत्वातून उत्तर देण्यावर मेस्सीचा भर, तर रोनाल्डोने जशास तसे उत्तर देणे पसंत केले.

चेंडू सुपूर्द करण्याची क्षमता :  गोल करून स्वत: मोठे होण्याबरोबरच संघाच्या प्रत्येक खेळाडूला गोल करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची शैली महान खेळाडूमध्ये असावी लागते. मेस्सीकडे ती उपजत आहे, तर रोनाल्डोला एकहाती खिंड लढवण्यात आनंद मिळतो.

गती : या खेळात अचूकतेबरोबर गती ही तितकीच महत्त्वाची आहे. आजी-माजी खेळाडूंनी या बाबतीत मेस्सीलाच पसंती दर्शवली आहे. गती आणि अचूकता याचे योग्य मिश्रण मेस्सीमध्ये आहे. शारीरिक रचनेमुळे रोनाल्डो गतीच्या बाबतीत आघाडीवर असला तरी त्यामध्ये अचूकतेचा अभाव आहे.

बचाव : काही सर्वेक्षणांनुसार प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवण्याची कला मेस्सीने योग्यरीत्या आत्मसात केलेली आहे. रोनाल्डोकडेही ती आहे, परंतु आक्रमण आणि बचाव यातील समन्वय राखण्यात त्याला अपयश येते. बचावाच्या नादात रोनाल्डोकडून होणाऱ्या चुकांचे प्रमाण हे अधिक आहे.

नेतृत्वकौशल्य आणि संघभावना :  च्या हंगामावर नजर टाकल्यास मेस्सीने आपल्या नेतृत्वकौशल्याने बार्सिलोनाला पाच जेतेपदे पटकावून दिली. याउलट माद्रिदची पाटी कोरीच राहिली. संघाला सोबत घेऊन जाण्याची भावनाच मेस्सीच्या यशामागचे रहस्य आहे.

२०१५-१६ हंगामाची कामगिरी

सामने गोल    जेतेपदे

६१     ५२     ०५

५२     ५७     ००

swadesh.ghanekar@expressindia.com